पुणे: शहराचे ऐतिहासिक काळापासून पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. यापैकी पुर्व भागातच कोरोना विषाणू बाधित रूग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्या तुलनेत पश्चिम भागात रूग्णांची संख्या कमी किंवा नाहीच. जागा लहान, माणसे जास्त हेच याचे कारण असावे असा वैद्यक क्षेत्रात कार्यरत असणार्यांचा अंदाज आहे.पुर्व भागातच रूग्णांची संख्या जास्त का याबाबत लोकमत बरोबर बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, या आजारात सध्या तरी विलगीकरण म्हणजे एकमेकांपासून किमान ३ फूट अंतरावर राहणे हाच ऊपाय आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी याच भागात होत.नाही हे दिसते आहे. त्याची कारणे आर्थिक किंवा सामाजिक असतील, म्हणजे मोठी घरे मिळाली तर ती कोणाला नको असतात असे नाही पण ती घेता येत नाहीत. एकत्र कुटुंब असणे किंवा अशा काही गोष्टी आहेत, मात्र तरीही विलगीकरण पाळले गेले पाहिजे.प्रशासनाने या परिसरात प्रबोधन तसेच सक्ती करून विलगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच पद्धतीने नागरिकांना याचे महत्व.पटवून देता येईल. जिल्हा प्रशासानाबरोबर यापूर्वी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. या भागातील शाळा, महाविद्यालये, वसतीगृहांच्या इमारती ताब्यात घेऊन तिथे काही जणांची व्यवस्था करावी असे सुचवण्यात आले होते, मात्र या परिसरातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता ते व्यवहार्य नाही असेच लक्षात आल्याने पूढे त्यावर.काही झाले.नाही अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली.दरम्यान प्रशासनाच्याही लक्षात ही बाब आली असल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. त्यामुळेच सील व कर्फ्यू या ऊपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे या भागात काम करणार्या, नागरिकांशी परिचित असणार्या स्वयंसेवी संस्था, संघटना या़च्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन विलगीकरण कसे महत्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. तत्पूर्वी महापालिकेच्या माध्यमातून या परिसरातील प्रत्येक घराचे, कुटुंबातील सदस्यांच्या माहितीसह सर्वेक्षण करण्यास सुरूवात झाली आहे. प्रभागनिहाय कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येकावर किमान १५० घरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
..........
पुण्याच्या पुर्व भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे, काही कारणांनी तिथे सोशल डिस्टन्सिंग फार काटेकोर पणे पाळले जात नाही हे खरे आहे. त्यासाठीच आम्ही ७६ वसतीगृह ताब्याय घेऊन ठेवली आहेत. एकट्या सीओपीच्या वसतीगृहांत ८०० जणांची क्षमता आहे. पण कोणालाही घरातून तो जास्तीचा सदस्य आहे म्हणून बाहेर काढता येणे शक्य नाही. म्हणूनच त्याची तयारी ठेवली असली तरीही त्याचबरोबर आम्ही या भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करत आहोत. दीड लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले, अजून करत आहोत. निदर्शनास आले की लगेच त्यांना विलग करतो आहोत. तसेच काही समुपदेशकांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कामही सुरू आहे. नागरिकांना बरोबर घेऊनच हे काम करायचे असल्याने त्याला मर्यादा येत असल्या तरी त्यावर नक्की मात करता येईल असा विश्वास आहे. - शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका.