नीलेश राऊत - पुणे : कोरोना म्हटले की, नायडू व ससून हॉस्पिटल किंबहुना अन्य सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार ! हा पुर्णपणे गैरसमज असून, कोरोनाचा संसर्ग झालेला रूग्ण खासगी रूग्णालयातही उपचार घेऊ शकतो. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलच्या धास्तीमुळे तपासणीसाठी पुढे न येणाऱ्या कोरोना संशयितांनी, खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी व पॉझिटिव्ह अहवाल आल्यास तेथे उपचार घ्यावेत, पण कोरोना आजार लपवून किंवा त्यापासून दूर पळून जाऊ नये असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. शहरात अमूक एक भागात कोरोनाचा रूग्ण आढळून आला व मी त्याच्या संपर्कात आलो होतो. मलाही सर्दी खोकला झाला आहे. पण कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर माझी रवानगी थेट सरकारी हॉस्पिटलमध्येच होणार, या भीतीने आज सौम्य लक्षणे असलेले अनेक जण तपासणी करण्यास पुढे येत नाहीत. परंतु, त्यांच्या मनातील सरकारी हॉस्पिटलची भीती पुर्णपणे अनाठायी असून, तुमच्या मनात कोरोना संसर्गाविषयी शंका आल्यास किंवा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात कुठलीही खबरदारी न घेता आला असाल तर, खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वॅब तपासणी करू शकता व अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच ठिकाणी उपचारही घेऊ शकतात. पुणे महालिकेने शहरात उभारलेले क्वारंटाईन सेंटरह्ण (विलगीकरण कक्ष) मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेले, पण जे दाट वस्तीत अथवा झोपडपट्टीत रहिवासी आहेत, तसेच ज्यांना लहान घरांमध्ये स्वतंत्र राहता येत नाही, स्वतंत्र शौचालय नाही अशा संशयित व्यक्तींनाच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेचे क्वारंटाईन सेंटर अथवा आयसोलेश सेंटर हा एकच पर्याय कोरोना संशयित अथवा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी नाही. पुणे महापालिकेने पालिकेच्या सीसीसी सेंटर, नायडू हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल व मोबाईल व्हॅन यंत्रणेच्या व्यतिरिक्त खासगी लॅबमध्ये कोरोना संसगार्शी साम्य असलेल्या व्यक्ती आपली तपासणी करू शकतात. यामध्ये ''मेट्रो पॉलिस, एजी डायगनॉस्टिक,रूबी हॉल क्लिनिक, क्रस्रा लॅब, सह्याद्री हॉस्पिटल, एसआरएल सबअर्बन '' या खासगी लॅबचा समावेश आहे. या लॅबचे कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या घरी येऊनही स्वॅब तपासणीसाठी घेऊन जातात. परंतु, संबंधित व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन स्वॅब तपासणी घेणे हे अधिक सोयीस्कर असून, वेळेत तपासणी केली व त्यावर उपचार घेतले तर कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारावर सहज मात करता येऊ शकेल असा विश्वास महापालिकेचे साथरोग प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे. -------------------खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचा पर्याय खुला - रूबल अगरवाल कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर संबंधित रूग्ण खाजगी हॉस्पिटलमध्येही उपचार घेऊ शकतात. ज्यांची खाजगी हॉस्पिटलमध्ये खर्च करण्याची क्षमता नाही व ज्यांना सरकारी हॉस्पिटलमधील क्षमता पूर्ण झाल्याने उपचारासाठी अन्यत्र पाठवावे लागते. अशांसाठी पुणे महापालिकेने शहरातील काही खासगी हॉस्पिटलबरोबर कोव्हिड-१९ आजाराबाबत करार केले असून, त्यांचा खर्च महापालिका देत आहे़ त्यामुळे अन्य कोरोना संशयित रूग्ण की ज्यांना खासगी रूग्णालयात उपचार घ्यावयाचे आहे ते तेथे उपचार घेऊ शकतात. त्यांना हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंका आली असल्यासही अशी व्यक्ती खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वॅब टेस्ट करून तेथेच उपचार घेऊ शकतात, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली. -----------------कोरोनाबाधितांवर उपचारासाठी खासगी हॉस्पिटलने पुढाकार घ्यावा - महापौर कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे आता नायडू हॉस्पिटल असे नाही़ तर, खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेऊ शकतो. अशावेळी शहरातील जास्तीत जास्त खासगी हॉस्पिटलनेही, संबंधित रूग्णावर उपचार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोरोनाच्या संकंटाच्या काळात खाजगी हॉस्पिटलने उपचार करताना, वैद्यकीय उपचार खर्चात सवलत द्यावी असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.-------------------काळजी करू नका, आरोग्य विमाही लागू कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने, या आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य विमा (मेडिक्लेम) लागू आहे. याबाबत दि न्यू इंडिया इन्स्युरन्स कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पांचाळ यांनी सांगितले की, कोव्हिड-१९ हा आजार वैद्यकीय विमा अंतर्गत ग्राहय धरला गेला असून, या आजारावरील उपचारांचा खर्च आरोग्य विमा नियमाला आधीन राहून केला जात आहे.------------------
Corona virus : कोरोनावर उपचार फक्त 'सरकारी' नव्हे; खासगी हॉस्पिटलचा पर्याय खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 1:37 PM
कोरोना म्हटले की सरकारी हॉस्पिटलच हा गैरसमज दूर करा
ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलमध्येही तुम्ही उपचार घेऊ शकता : आजारापासून दूर पळू नका ! कोरोनाबाधितांवर उपचारासाठी खासगी हॉस्पिटलने पुढाकार घ्यावाकोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर संबंधित रूग्ण खाजगी हॉस्पिटलमध्येही उपचार घेऊ शकतातकाळजी करू नका, आरोग्य विमाही लागू