पिंपरी : सकाळच्या नाश्त्यात दोन इडल्या मिळतात त्याने पोटाला काय आधार मिळणार आहे का? दुपारी आणि रात्रीचे जे जेवण दिले जाते ते कमी आहे. बेडवर टाकण्यासाठी बेडशीटची दोन दिवसांपासून मागणी करत आहोत ते अजुन मिळाले नाही. इतर कोविड सेंटरला हळदीचे दुध, गरम पाणी मिळते येथे मात्र काहीच सुविधा नाहीत. पोटभर जेवण देखील नाही. अशावेळी काय करायचे असा प्रश्न बालेवाडीत विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांनी प्रशासनाला विचारला आहे. बालेवाडीतील बँटमिंटन इनडोअर स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये सध्या 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यात विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. रुग्ण या सेंटरच्या बाहेर येऊन परिसरात फिरु नये यासाठी त्या कक्षाला बाहेरुन कुलूप लावण्यात आले होते. कक्षात जाऊन त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा याविषयी विचारणा करण्यात आली.
याबाबत माहिती देताना एक जण म्हणाले, आमच्या माहितीनुसार शहरात रुग्णांच्या विलगीकरणासाठी जे कोविड कक्ष उभारण्यात आले आहेत तिथे रुग्णांची चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जाते. त्यांना पोटभर नाश्ता, जेवण दिले जाते. पिण्यासाठी गरम पाणी मिळते. त्या तुलनेत येथे काही सोयीसुविधा नाहीत. फारसे कुणी फिरकत नाही. जे कर्मचारी आहेत ते आम्हाला फार दुर्धर आणि भयानक आजार झाला आहे असे भासवून त्यानुसार संवाद साधतात. आम्हाला गोळया घ्याव्या लागतात.अशक्तपणा येऊ नये यासाठी पोट भरेल एवढे अन्न प्रशासनाने द्यायला नको का? सकाळी नाश्ता येतो, दुपारी जेवण येते. मात्र त्याच्या वेळेत काही समन्वय नसल्याचे एका रुग्णाने सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या सुविधा मिळणार असतील तर इतर रुग्णांची काय अवस्था असेल? ज्या गोष्टी लागतात त्या वेळेवर का दिल्या जात नाही. तक्रार करण्यात आलेल्या कक्षात एकूण सहा कर्मचारी असून इतरांना आणखी दुसऱ्या विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात चार चपात्या, दोन भाज्या, डाळ आणि भात याचा समावेश आहे. तर नाश्त्याला पोहे, उपीट, इडली देण्यात येत असल्याचे एका कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.
.........................................
तर घरुन डबे मागवा बालेवाडीतील स्टेडियम मध्ये वेगवेगळया ठिकाणी मोठया संख्येने कोरोना रुग्ण विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहेत. यातील काही जणांना घरुन डबे आणून दिले जातात. मात्र त्याची संख्या कमी आहे. प्रशासनाकडून नेमून दिल्यानुसार रुग्णांना जेवण दिले जाते. यात कुणाला कमी अधिक देण्याचा प्रश्न नाही. मात्र यावरुन वाद होतो आहे. फार अडचण असल्यास रुग्णांनी आपल्या नातेवाईकांमार्फत घरचा डबा मागवावा. अशी प्रतिक्रिया त्या कोविड सेंटर बाहेरील एका कर्मचाऱ्याने दिली.