पुणे : ससून रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांना सध्या सलग १४ दिवस कोविड रुग्णालयात काम करावे लागणार आहे. तसेच त्यानंतर पुढील १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. परिणामी, शारीरिक व मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे कामाचे दिवस सातच करावेत, अशी मागणी निवासी डॉक्टर व परिचारिकांकडून केली जात आहे. दरम्यान, ससूनमधील सहायक अधिसेविकेचा शुक्रवारी झालेला मृत्यू कामाच्या ताणामुळेच झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.रुग्णालयातील सहायक अधिसेविका अनिता राठोड यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. काही दिवसांपुर्वी राठोड यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण त्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. त्या कोरोनाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये कार्यरत होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता. त्यांच्या निधनानंतर शनिवारी सकाळी अनेक परिचारिकांनी रुग्णालय गाठत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. कामाचे तास कमी करण्यासह विविध अडचणी त्यांनी अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांच्यासमोर मांडल्या. सध्या कोविड रुग्णालयात काम करणाºया परिचारिका, निवासी डॉक्टर व इतर कर्मचाºयांना दि. २० एप्रिल ते ३ मे असे सलग चौदा दिवसांचे काम देणयात आले आहेत. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ७६ परिचारिका, ७० डॉक्टर व ३१ वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णालयात आहेत. पुढील २८ दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. ‘प्रत्येकाला सहा तासांचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार चार सत्रांमध्ये काम चालते. पण सलग सहा तास पीपीई कीट घालून काम करणे कठीण जात आहे. या वेळेत काही खाता-पिता येत नाही. स्वच्छतागृहातही जाता येत नाही. पीपीई कीटमुळे खुप घाम येतो. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची भिती वाटते. सलग चौदा दिवस अशाच पध्दतीने काम करत राहिल्यास इतर शारीरिक त्रास होऊ शकतात. त्याचप्रमाणे दि. ३ मे नंतर पुढील १४ दिवस त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे सलग महिनाभर कुटूंब, लहान मुलांपासून दुर राहावे लागेल. कामाच्या ताणाबरोबरच नंतर मानसिक ताणही येऊ शकतो. त्यामुळे कामाचे दिवस कमी करणे आवश्यक आहे. त्यानंतर चक्राकार पध्दतीने जेव्हा आम्हाला काम येईल, त्यानुसार सेवा करायला तयार आहोत, असे काही परिचारिका व डॉक्टरांनी सांगितले.--------राठोड यांचा मृत्यू कामाच्या अतिरिक्त ताणामुळेच झाला आहे. वरिष्ठांकडून सतत दबाव होता. परिचारिकांवरील कामाचा ताण कमी व्हावा म्हणून कामाचे दिवस १४ वरून सात दिवस करण्याची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार परिचारिकांंच्या कामाच्या दिवसांमध्ये बदल केला जाईल.- प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन
Corona virus : कामाचे दिवस चौदा नको, सात करा : ससून परिचारिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:34 PM
ससूनमधील सहायक अधिसेविकेचा मृत्यू कामाच्या ताणामुळेच झाल्याचा आरोप...
ठळक मुद्दे ७६ परिचारिका, ७० डॉक्टर व ३१ वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णालयातपुढील २८ दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली हॉटेलमध्ये सलग सहा तास पीपीई कीट घालून काम करणे कठीण