पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहा दिवसांच्या अत्यंत कडक लॉकडाउनची सोमवारी मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे. पण पुणेकर क्षुल्लक कारणांसाठी विनामास्क रस्त्यावर फिरत आहे, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांनी जवळपास २००० हजारांपेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई केली आहे. मात्र, तरीसुद्धा शहरातील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पुण्यातील स्वारगेट येथे शुक्रवारी ‘यमराज’यांनी चांगलीच तंबी दिली.
पुणे शहरातील स्वारगेट येथे यमराजाच्या वेशात रेडा घेऊन उभे होते. त्यांनी नागरिकांना घरात बसा, किंवा माझ्यासोबत येण्यास तयार राहा याप्रकारे प्रबोधनात्मक जनजागृती केली. तसेच त्याठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांना नियमांचे पालन करा असे आवाहन देखील केले.
एकीकडे पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना लॉकडाऊनला अजून काही नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. काहीजण उत्तमरित्या शिस्तीचे पालन करत आहे मात्र काही लोक प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मोकाट फिरत आहे. ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. यांसारख्या बेशिस्त लोकांसाठी मी रस्त्यावर उतरलो आहे. असे मत यमराजाचा वेशभूषा केलेले सुजय खरात यांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काहीजण स्वतःसह इतर नागरिकांच्या जीवाशी खेळत रस्त्यावर उतरत आहे. त्याच धर्तीवर नागरिकांनी नियमांचे पालन करत घरीच सुरक्षित राहत प्रशासनाला सहकार्य करावे. सर्जेराव बाबर, सहायक पोलीस आयुक्त