पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी ठरत असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिलासादायक आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एक लाखाहून अधिक रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सिरो सर्व्हेक्षणानुसार ५१ टक्के लोकांमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारकशक्ती आणि रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण अशा यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे, संसर्गाच्या प्रसाराचा वेग रोखता यावा यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. दररोजचे व्यवहार सुरळीत करून 'न्यू नॉर्मल' मध्ये प्रवेश करत असताना नागरिकांनी शारीरिक अंतर पाळावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करणे जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये पुरेसे बेडस उपलब्ध व्हावेत, यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असून, जास्तीत जास्त रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने २५ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यामध्ये आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,५५,०३९ इतकी असून त्यापैकी १,०९,०३९ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या ४२,१७७ सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत ३८२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २५ ऑगस्ट रोजी पुणे शहरात १२२८, पिंपरी चिंचवडमध्ये ८४२ तर पुणे ग्रामीणमध्ये ४५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. पुणे शहरातील आजवरच्या बाधित रुग्णांची संख्या ९१,४८५, पिंपरी चिंचवडमध्ये ४१,९९९ तर पुणे ग्रामीणमध्ये २१,५५५ इतकी नोंदवली गेली आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे नागरिक विनाकारण बाहेर पडून संसर्गास कारणीभूत ठरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही निर्णयासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता, स्वयंशिस्त पाळावी, सर्व नियमांचे पालन करावे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांची रोजची संख्या चिंतातुर करणारी असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे. मृत्यूदर कमी असून, घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात २३ ऑगस्टपर्यंत ६,३३,२१७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.------जिल्हा आणि राज्याच्या आकडेवारीतील तफावत कायम
राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्यातर्फे जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीतील तफावत अजूनही कायम आहे.
राज्याच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण- १,५५,०३९बरे झालेले रुग्ण - १,०९,०३९
जिल्ह्याच्या अहवालानुसार,पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण- १,४९,८९७बरे झालेले रुग्ण - १,१५,३३८