बारामती : बारामती कोणताही कोरोनाचा रूग्ण अढळला नाही. विदेशातून आलेल्या दोघांना नायडू रूग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र त्यातील एकामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसल्याने तपासणी न करताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माघारी पाठवले. तर एका संशयिताचा उद्या अहवाल मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, तसेच विदेशातून आलेल्या व्यक्तींनी आवश्यकता असल्यास स्वत:हून पुढे येऊन तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.
बारामतीमध्ये कोरोनाचे तीन संशयित रूग्ण सापडल्याच्या बातम्या काहीमाध्यमांमधून पसरल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. अधिक माहिती देताना डॉ.खोमणे म्हणाले, बारामती तालुक्यात जर्मनी, दुबई, अमेरिका, नेदरलँड, इटलीआदी देशातून आलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घरातच वास्तव्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात असे १० आणि शहरामध्ये१० व्यक्ती आहेत. दररोज तालुका व शहरामध्ये १६९ पथकांच्या माध्यमातून ५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन दिवसांमध्ये १५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता फक्त काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. पुढे देखील हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. त्यामध्ये विदेशातून आलेल्या व्यक्ती आढळून येतील. अशा व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती प्रशासनास कळवावी.त्रास होत असल्यास तपासणी करून घ्यावी, संसर्ग टाळण्यात या व्यक्तींचा स्वयं सहभाग खुप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण लवकरच या संसर्गावर मात करू, असा विश्वास देखील व्यक्त केला.---------------------