पुणे : ससून रुग्णालयातील नर्सना कोव्हिड वॉर्डमध्ये सात दिवस ड्युटी केल्यानंतर सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी दिला जात होता. नवीन आदेशानुसार, क्वारंटाईन कालावधी तीन दिवसांचा करण्यात आला आहे. ते तीन दिवस हॉटेलमध्ये न राहता घरी पाठवण्यात येणार आहे. या निर्णयाला परिचारिकांनी तीव्र विरोध केला आहे. ‘आमचा जीव धोक्यात घालतोच आहे, मात्र आमच्यामुळे कुटुंबाला कोरोनाचा धोका निर्माण होऊ देणार नाही’, असा पवित्रा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने घेतला आहे. या मागणीसाठी गुरुवारी ससून सर्वोपचार रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना संकटाच्या अगदी पहिल्या दिवसापासून डॉक्टरांप्रमाणेच नर्सही अग्रणी राहून लढा देत आहेत. एकीकडे सामान्य कोरोनाच्या भीतीने धास्तावले असताना स्व:च्या जिवाला होणारा धोका पत्करुन नर्स कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयात सुमारे १००० परिचारिका कार्यरत आहेत. परिचारिका पाच महिन्यांहून अधिक काळ कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये १०० हून अधिक नर्सना कोरोनाची लागण झाली. कोरोनावर यशस्वी मात करुन बहुतांश नर्स पुन्हा कामावर रुजू झाल्या.आतापर्यंत सात दिवस कोव्हिड वॉर्डमध्ये ड्युटी करत असताना त्यांच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील सात दिवस त्यांना हॉटेलमध्येच क्वारंटाईन केले जात होते. आता कोव्हिड वॉर्डमधील सात दिवसांची ड्युटी केल्यानंतर क्वारंटाईन कालावधी तीन दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. हे तीन दिवस नर्सना हॉटेलऐवजी घरी पाठवले जाणार आहे. कोव्हिड वॉर्डमध्ये ड्युटी केल्यावर घरी जाऊन कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण करायचा का, असा प्रश्न नर्सनी उपस्थित केला आहे. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचीही भेट घेण्यात आली.
-------------------------------काय आहेत मागण्या?* परिचारिकांसाठी क्वारंटाईन कालावधी ७ दिवसांचा असावा.* महाराष्ट्रात सर्व स्तरांतील रुग्णालयांमध्ये जवळपास ६००० पदे रिक्त आहेत. बंधपत्रित आणि कंत्राट पध्दतीवर असणा-या परिचारिकांची पदे भरुन त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.* कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णांची सेवा करताना दर्जेदार संरक्षक साहित्य मिळावे.* परिचारिकांची ड्युटी ४ तासांची असावी. सलग आठ तास पीपीई किट घातल्याने शारीरिक त्रास होतो. त्यांना जेवण, चहा, नाश्ता घेता यावा आणि वॉश रुमला जाता यावे.* कोरोनाबाधित परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबासाठी २० टक्के जागा राखीव असाव्यात.* कोरोनामुळे मृत्यू झालेल्या परिचारिकांच्या कुटुंबासाठी ५० लाखांचा विमा मंजूर करावा आणि कुटुंब परिचारिकेवर अवलंबून असल्यास वारसाला अनुकंपातत्वाखाली शासकीय नोकरी द्यावी.* बृहन्मुंबई महानगरपालिकेतील परिचारिकांना दररोज ३०० रुपये भत्ता मिळतो. सरकारी रुग्णालयात काम करणा-या परिचारिकांनाही तो मिळावा.* बाधित आणि संशयित रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी शासनाने समिती नेमून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात.-------------------------------परिचारिकांची नियमित स्वॅब तपासणी व्हावी
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोव्हिड वॉर्डमध्ये ड्युटी करणा-या परिचारिकांच्या घशातील द्रवपदार्थांचे नमुने नियमितपणे तपासले जात होते. स्वॅब तपासणी करुनच त्यांना घरी सोडले जात होते. मात्र, आता यामध्ये चालढकल केली जात आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून स्वॅब चाचणी करण्यात आलेली नाही. एखादी परिचारिका कोरोनाबाधित असल्यास आणि निदान न झाल्यास तिच्याकडून कुटुंबाला कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.--------------------------------------सात दिवसांची ड्युटी करेपर्यंत हॉटेलमध्ये ठेवले जाते आणि ड्युटी संपली की हॉटेलची खोली रिकामी करुन घरी जाण्यास सांगितले जाते. अनेकींची घरी लहान असल्याने क्वारंटाईन होता येत नाही. घरात लहान मुले, वृध्द असल्याने त्यांना लागण होऊ शकते. अनेक परिचारिकांना लागण झाल्याने कुटुंबातील व्यक्तीही कोरोनाबाधित झाल्या. त्यामुळे परिचारिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अधिष्ठाता सरांशी चर्चा करुनही काही उपयोग झालेला नाही.- प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन