लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता अन्नधान्याचा अविरत पुरवठा करणाऱ्या गुलटेकडी येथील घाऊक व्यापाऱ्यांचा ʻलोकमतʼच्यावतीने ʻकोरोना योध्दाʼ म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरोना कालावधीत कडक लॉकडॉऊन असताना पुना मर्चंट चेंबरच्या सदस्यांसह अन्य घाऊक व्यापाऱ्यांनी गत आठ महिन्यात केवळ तीन दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने भूसार मालाचा पुरवठा केला. हे करीत असताना काही व्यापाऱ्यांना आपल्या प्राणांची आहूतीही द्यावी लागली. अत्यंत संकटाच्या काळात कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या या व्यापाऱ्यांचा सन्मान ʻलोकमतʼच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात आला. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती, राजेंद्र बांठीया, नगरसेवक प्रविण चोरबेले, लोकमत चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना, पोपटलाल ओसवाल म्हणाले, जागतिक संकटकाळात प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही व्यापाऱ्यांना आरोपांचे धनी व्हावे लागले मात्र ʻलोकमतʼने आमच्या कामाची दखल घेतली याचा विशेष आनंद होत आहे. तर, वालचंद संचेती म्हणाले, सरकार दरबारी व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण आली की ʻलोकमतʼ आमच्या समस्यांना वाचा फोडतो. त्याचा सुयोग्य परिणाम होतो, त्याबद्दल आभार.
प्रविण चोरबेले म्हणाले, व्यापाऱ्यांचा सन्मान करण्याबाबत कोणालाही सुचले नाही मात्र ʻलोकमतʼने आमच्या कार्याची दखल घेतली, याबद्दल समाधान वाटते. तर, राजेंद्र बांठीया म्हणाले, भूकबळी पडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले. इतकेच नव्हे तर रेशन वाटपासाठी मदतही केली.
यावेळी, अशोक लोढा, अनिल लुंकड, प्रकाश नहार, रायकुमार नहार, ईश्वर नहार, राजेंद्र भट्टड, दिलीप कटारीया आदी उपस्थित होते.
.............
(फोटो तन्मयने दिला आहे)