राजानंद मोरे- पुणे : कोरोना विषाणुशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर आणि परिचारिकांना तेवढ्याच हिंमतीने लढा द्यावा लागत आहेत. एकदा पर्सनल प्रोटेक्टिव ईक्विपमेंट (पीपीई) कीट घातल्यानंतर चार ते आठ तास साधे पाणीही पिता येत नाही. ना काही खाता येते ना स्वच्छतागृहात जाता येते. घसा कोरडा पडला तरी समोरील पाण्याकडे बघून आपली तहान भागवावी लागत आहे. हा ताण कमी करायचा असेल तर प्रत्येकाने घरात बसून साथ द्यावी, असे आवाहन हे कोरोना वॉरियर्स करत आहेत.कोरोना विषाणुपासून बचावासाठी बाधित रुग्णांशी थेट संपर्कात असलेले डॉक्टर्स, परिचारिकांना पीपीई कीट वापर करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने अतिदक्षता कक्षामध्ये असणाऱ्यांना हे कीट घालणे बंधनकारक आहे. पण हे कीट एकदा घातल्यानंतर ते पुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे काम पुर्ण होईपर्यंत मास्क किंवा ग्लोव्हजही काढता येत नाहीत. अन्यथा संसर्ग होण्याचा धोका असतो. डॉक्टर व परिचारिकांच्या आरोग्यादृष्टीने दक्षता म्हणून जागतिक पातळीवर चार ते पाच तासापेक्षा जास्त हे कीट वापरले जात नाही. पण कीट तसेच मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने भारतासह अन्य देशांतही चार-पाच तासांपेक्षा जास्त तास हे कीट वापरले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्यात नायडू, ससून, सिम्बायोसिस व भारती हॉस्पीटल कोविड रुग्णालये आहेत. तसेच आणखी काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित एक-दोन रुग्ण आहेत. चार प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णसंख्या व उपलब्ध मनुष्यबळ विचारात घेऊन त्यांना शिफ्ट देण्यात आल्या आहेत.ससून रुग्णालयामध्ये प्रत्येकाला किमान सहा ते आठ तास काम करावे लागत आहे. हीच स्थिती नायडू रुग्णालयातही आहे. भारती हॉस्पीटलने बारा तासांची एक शिफ्ट केली आहे. मात्र, एका शिफ्टमध्ये सहा परिचारिका असतात. त्यांच्या सामंजस्यातून एका परिचारिकेला किमान दोन वेळी बदलता येते. तरीही किमान चार तास कीट वापरावे लागते. सिम्बायोसिसमध्ये डॉक्टर व परिचारिकांना अनुक्रमे सहा व आठ तासांची शिफ्ट देण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यात किमान चार ते आठ तासांपर्यंत परिचारिकांना पीपीई कीट घालून रुग्णसेवा करावी लागत आहे. 'सध्याची रुग्णसंख्या, उपलब्ध मनुष्यबळ आणि पीपीई कीटच्या तुटवड्यामुळे डॉक्टर व परिचारिकांच्या शिफ्ट लावल्या जात आहेत, ' असे सिम्बायोसिस हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन व भारती हॉस्पीटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी स्पष्ट केले.-----------------परदेशात जास्तीत जास्त चार शिफ्ट असते. त्यामुळे चोवीस तासात सहा शिफ्ट होतात. पण आपल्याकडील मनुष्यबळ आणि पीपीई कीटची उपलब्धता पाहता डॉक्टरांना सहा तास तर परिचारिकांना आठ तासांची शिफ्ट लावण्यात आली आहे. एकदा पीपीई कीट घातल्यानंतर शिफ्ट पूर्ण होईपर्यंत मध्ये काही खाता-पिता येत नाही. स्वच्छतागृहातही जाता येत नाही. परिचारिकांच्या आरोग्यविषयक काही वैयक्तिक अडचणी असल्यास त्यांना शिफ्टमधून सुट देतो. पण पीपीई कीटच्या वापरात कसलीही तडजोड केली जात नाही.- डॉ. विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिम्बायोसिस हॉस्पीटल, लवळे-------------अतिदक्षता कक्षात थेट रुग्णांन हाताळाव्या लागणाऱ्या परिचारिका व डॉक्टरांना पीपीई कीट बंधनकारक आहे. मनुष्यबळ व पीपीई कीटच्या उपलब्धतेनुसार बारा तासांची शिफ्ट करण्यात आली आहे. पण या शिफ्टमध्ये एकावेळी सहा परिचारिका असतात. त्यांना बारा तासात दोन कीट वापरण्याची परवानगी आहे. त्यामुळे चार-सहा तास कीट घालावेच लागते. कीट घातल्यानंतर काहीच खाता-पिता येत नाही. पण इतरवेळी त्यांना पोषक आहार दिला जात आहे.- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पीटल-------------पीपीई कीटमुळे संपुर्ण शरीर बंदिस्त होते. शरीराचा कुठलाही भाग उघडा राहत नाही. हे कीट घालून काही खाणे किंवा पिणे धोकादायक असते. त्यामुळे शिफ्ट संपेपर्यंत काहीच पर्याय नसतो. आतून गरम होते, घाम येतो. डिहायड्रेशनचा धोकाही आहे. स्वच्छतागृहात जाता येत नसल्याने तीही अडचण होते. पण अजून कोणाला त्रास झालेला नाही.- ससून कोविड रुग्णालयातील डॉक्टर-------------काही राज्यात डायपरचा वापरपीपीई कीट घातल्यानंतर शिफ्ट पुर्ण होईपर्यंत ते काढता येत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहात जाता येत नाही. त्यामुळे काही राज्यांमध्ये डॉक्टर व परिचारिकांना डायपर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. अद्याप आपल्याडे डायपरचा वापर सुरू झालेला नाही. पण डॉक्टर-परिचारिकांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक असल्याचे डॉ. विजय नटराजन यांनी सांगितले.------------
‘करावे तेवढे कौतुक कमीच!एक दोन नव्हे तर तब्बल आठ तास पाण्याशिवाय राबतायेत ‘कोरोना वॉरियर्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:44 PM
एकदा पीपीई कीट घातल्यानंतर चार ते आठ तास साधे पाणीही पिता येत नाही. ना काही खाता येते ना स्वच्छतागृहात जाता येते...
ठळक मुद्देकोरोनापासून बचावासाठी डॉक्टर्स, परिचारिकांना पीपीई कीट वापर करणे आवश्यक पुण्यात नायडू, ससून, सिम्बायोसिस व भारती हॉस्पीटल कोविड रुग्णालये