पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वरदान ठरलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्ण आता कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत जम्बो पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्याची क्षमता ७०० रुग्णांवर नेण्यात आली. दुसऱ्या लाटेमध्येही हजारो रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा फायदा झाला. पुण्यात रुग्ण कमी होत असून सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली गेली आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेटही साडेसात टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्या घटत चालली असून ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणी कमी झाली आहे. एकूण ७०० कार्यान्वित खाटांपैकी ५०० खाटा ऑक्सिजनच्या आहेत. यातील ३०० खाटा कमी करण्यात आल्या आहेत. तर, २०० ऑक्सिजन खाटा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच एचडीयूच्या १४० खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या ६० खाटा कार्यान्वित ठेवलेल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रुग्णांची संख्या सुद्धा वाढत गेली. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले. जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर येथील रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने ७०० वर नेण्यात आली होती.
----
जम्बो रुग्णालयाची सद्यस्थिती
एकूण क्षमता - ८००
सक्रिय खाटा - ७००
ऑक्सिजन खाटा - ५००
(यापैकी ३०० कमी केल्या)
आयसीयू, व्हेंटिलेटर, एचडीयू - २००
सध्या कार्यान्वित - ४००
----
जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन खाटांची मागणी कमी झाली आहे. त्यानुसार जम्बोमधील ३०० खाटा कमी केल्या आहेत. एचडीयू, आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरील रुग्ण कमी झालेले नाहीत. या २०० खाटा आणि ऑक्सिजनच्या २०० खाटा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरात सकारात्मक चित्र निर्माण होत आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका