लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या चळवळींचे आज काय झाले, याचा शोध घेतला पाहिजे. भटक्या समाजाला गाव नाही तर पाणवठा कसा असणार, कोरोनाकाळात या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान काय आहे, कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का? असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी उपस्थित केला.
भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, राष्ट्र सेवा दल, ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निर्माण पुणे यांच्या वतीने राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजित भटके विमुक्तांच्या प्रश्नांच्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी फाउंडेशनचे सुभाष वारे, भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी अध्यक्षस्थानी होते.
शोषित समाजातील शिकलेले लोक मध्यमवर्गासारखे वागू लागतात. समाजाच्या प्रगतीसाठी ते मागे वळून पाहत नाहीत. आत्मनिर्भर भारतातील हे समाज आत्मनिर्भर कधी होणार? असा प्रश्न देखील बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
वारे म्हणाले, महिलांवर समाजातील लोकांकडून आणि इतर समाजाकडून अत्याचार होतात. सांस्कृतिक प्रतिमा ठळक करण्यासाठी सुरू केलेल्या अस्मितांच्या लढाया या शोषित समाजासाठी मारक ठरत आहेत. आपआपसातील लढाईमुळे शत्रूपर्यंत आपण पोहचू शकलेलो नाही. इतरांचे अधिकार मिळवण्यासाठी मूल्यव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. वाड्या, वस्ती आणि तांड्यापर्यंत संविधान पोहचू शकलेले नाही. काही शक्ती संविधान तोडायला निघाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आणि अधिकाराची लढाई लढत राहिली पाहिजे.
डॉ. गणेश देवी म्हणाले, ऐतिहासिक घटनांचा सूड घेणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वेडेपणा आहे. बाबराचा असो किंवा ब्रिटिशांचाही सूड हा आत्ता घ्यायचा नाही. उलट बुद्ध आणि गांधींच्या देशातील क्षमाशील लोक ब्रिटिशांना क्षमा करतील. मनूचा आणि गुन्हेगारी जमातीचा कायदा करणाऱ्या मायोचा पुतळा हटवला पाहिजे तसेच मागासवर्गीय समाजासाठी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आर्थिक तरतुदीच्या सल्लाप्रमाणे भटके समाजाचाही विचार झाला झाला पाहिजे.
संतोष जाधव यांनी स्वागत केले. नारायण जावलीकर यांनी सूत्रसंचालन केले.