त्या अनुषंगाने सदरचे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना व संजय गांधी निराधार अनुदान यांची प्रकरणे करण्यासाठी पुढीलप्रमाणे विहित केलेला कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. कोरोनामृत कुटुंबीयांच्या गृहभेटी घेणे, अर्ज भरून घेणे व कागदपत्रे प्राप्त करणे, २६ जून व २७ जून २०२१ रोजी सर्व प्रकरणे तलाठी व मंडल अधिकारी यांचे स्वाक्षरीसह तहसील कार्यालय येथे जमा करणे. २८ जून व २९ जून २०२१ रोजी तालुकास्तरीय समितीच्या बैठका घेणे. ३० जून २०२१ रोजी मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिध्द करणे.
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या विधवांसाठी संजय गांधी योजनेच्या प्रकरण करणे कामी संजय गांधी योजना फॉर्म सोबत तहसीलदारांचा २१ हजारच्या आतील उत्पन्नाचा दाखला, वय ६५ वर्षाच्या आतील, प्रकरण करणाऱ्या महिलेच्या मुलाचे वय २५ वर्षांच्या आतील व पतीचा मृत्यू दाखला, आधारकार्ड अशी कागदपत्रे विहीत मुदतीत आपल्या भागातील तलाठी यांच्याकडे जमा करावी. तसेच ज्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचे निधन झाले आहे (फक्त १८ ते ५९ वयोगटातील) अशा कुटुंबाच्या पाल्यांनी सुध्दा राष्ट्रीय कुटुंब योजनेंतर्गत विहित मुदतीत आपल्या भागातील तलाठी यांचेकडे कागदपत्रे जमा करावी.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या अर्जावर निर्णय घेणेकामी सोमवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता संजय गांधी गठीत समितीची बैठक प्रशासकीय भवन येथील बैठक हॉल येथे घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी कळविले आहे.