पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांचे तसेच विद्यापीठांचे शैक्षणिक कामकाज सध्या थांबले आहे. मात्र, केंद्र शासनाच्या व इतर नामांकित खाजगी शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळावरून घर बसल्या विविध मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे, लाखो विद्यार्थ्यांनी घरातून ऑनलाईन पद्धतीने अनेक पदवी व पदविका घेतल्या आहेत. त्यामुळे घरी बसून वेळ वाया घालू नका तर आपल्या ज्ञानात भर झाला, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी घरी बसून काम करत आहेत. या सर्वांसाठी नाविन्यपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत,असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सध्या घरी बसून कंटाळा येत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा संपले आहेत. त्याचप्रमाणे जेईई, नीट,सीईटी या प्रवेश पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा 14 एप्रिल नंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळा,महाविद्यालयांना टाळे आहे.मात्र, केवळ वर्गात बसूनच शिक्षण घेता येते असे नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे घरबसल्या विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य झाले आहे.
केंद्र शासनाच्या स्वयम् पोर्टल सह मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स (मूक), युडीएसिटी, खान अकॅडमी, स्किल शेअर, टीईडी ईडी, ओपन एज्यु अशा विविध संकेतस्थळांवर मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात प्रोग्रामिंग, बिजनेस, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, लाईफ सायन्सेस, इंजीनियरिंग आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासकडून मिळणारे मार्गदर्शन सध्या मिळत नाही. मात्र, विविध संकेतस्थळांवरुन जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांची तयारी करता येऊ शकते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 14 एप्रिलनंतर होणार असून काही महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. परंतु, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी घर बसल्या स्वअध्ययनाने आपला अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.
गरज ही शोधाची जननी आहे. देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर उपाय शोधतील. मात्र, घरी बसून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला वेळ वाया घालवू नये. मूकसह विविध ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन कौशल्य विकसित करणारे आणि स्वतःला सक्षम करणारे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा विचार करणे उचित ठरेल.
-डॉ.राम ताकवले,ज्येष्ठ शिक्षतज्ज्ञ व माजी कुलगुरू