उत्तमनगर: कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरूच आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत त्यामुळे प्रशासनही सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरत आहे. गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले अनेकांचे जवळचे नातेवाईक गेले. रोजगारावर परिणाम झाला.
अशा परिस्थितीत लोकांचे मृत्यु होत असताना जवळचे नातेवाईक सुद्धा अंत्यविधीसाठी पुढे येण्यास घाबरत आहेत. पुणे शहरात काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आणि त्यांनी लोकांची जात धर्म न पाहता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंत्यविधी करण्यास सुरुवात केली. अशीच एक संस्था उम्मत या नावाने गेल्या दीड वर्षांपासून सतत हे काम करत आहे.
उत्तमनगर येथील संस्थेचे कार्यकर्ते जिशान कुरेशी यांना विचारले असता त्यांनी माहिती दिली की, उम्मत ही संस्था दीड वर्षांपासून कार्यरत आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष जावेद खान ह्यांनी पुढाकार घेऊन ही संस्था सुरू केली. कोणत्याही अपेक्षेविना हे काम करत असताना आज त्यांच्या बरोबर अजूनही ४० कार्यकर्ते जोडले गेले आहेत. उम्मत ह्या संस्थेने आज पर्यंत १२५० अंत्यविधी केले आहेत ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, लिंगायत अशा सर्व समाजाच्या लोकांचा समावेश आहे.
संस्थेला पुणे महानगर पालिकेकडून पीपीई किट, मोजे, पायमोजे असा संपूर्ण संच दिला जातो. शहरात ठरवून दिलेल्या रुग्णालयात जिथे रुग्णांचा मृत्यू झाला त्याची माहिती दिली जाते. ती मिळताच संस्थेच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर त्याचे नियोजन करून कार्यकर्ते तिथे पाठवले जातात. जिथे घरातील जवळचे नातेवाईक ही साथ सोडून जातात. अशा ठिकाणी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. संस्थेमध्ये तरुण वर्ग आणि प्रौढ व्यक्ती देखील कार्यरत आहेत. पुणे महानगर पालिके कडून दिले जाणारे किट हे खूप जाड असल्याकारणे बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागतो. काही वेळा ही संस्था स्वतःच्या खर्चाने देखील किट खरेदी करत आहे.