डॅशबोर्ड नावालाच : प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शासकीय रूग्णालयांसह महापालिकेच्या रूग्णालयांमधील सर्वच बेड (खाटा) फुल्ल झाले आहेत, तर खासगी रूग्णालयातील कोविड-१९ रूग्णांसाठीचे राखीव बेडही आता कमी पडले असून, शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे़
कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्याने शहरातील ९० हून अधिक खाजगी रूग्णालयांनी आपल्या रूग्णालयातील राखीव बेड कमी केले होते़ मात्र गेल्या महिनाभरापासून रूग्णसंख्या सातत्याने वाढत असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही २२ हजाराच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा शहरात सप्टेंबर,२०२० ची आठवण जागी झाली असून, कोरोनाबाधित रूग्णाला बेड मिळावे म्हणून नातेवाईकांची धावपळ पाहण्यास मिळत आहे़
आजमितीला गंभीर रूग्ण संख्या कमी असली तरी, कोरोनाबाधित रूग्णांपैकी ज्येष्ठ नागरिक तथा अन्य आजाराच्या व्यक्तीची आॅक्सिजन पातळी कमी होताना आढळून येत आहे़ यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या संबंधित रूग्णास तातडीने रूग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे़ परंतु, ऐनवेळी सहजपणे कोणालाच बेड मिळत नसल्याने, अमुक एक व्यक्तीची ओळख काढणे, वेळप्रसंगी जास्त पैसे भरणे असे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत़
महापालिकेचे बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डॉ़ नायडू हॉस्पिटल, लायगुडे, खेडेकर, दळवी हॉस्पिटलमधील सर्व आॅक्सिजन बेड फुल्ल झाले असून, महापालिकेने ज्या दोन खाजगी रूग्णालयांशी सामजंस्य करार केला आहे. तेथेही सध्या बेड उपलब्ध नाहीत़
--------------------
डॅशबोर्ड नावालाच
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड-१९ च्या रूग्णांसाठी शहरातील रूग्णालयांमधील बेडची उपलब्धता दाखविणारा डॅशबोर्ड नावालाच उरला आहे़ यावरील माहिती वेळच्या वेळी अपडेट न केल्याने, रिक्त बेड दाखविलेल्या रूग्णालयात नागरिक धाव घेतात, पण प्रत्यक्षात बेड उपलब्ध नसल्याचे तेथे गेल्यावर सांगितले जात आहे़
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात व आसपासच्या जिल्ह्यातही कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने, पुण्याबाहेरील काही रूग्णांनी शहरातील खाजगी रूग्णालयांकडे धाव घेतली आहे़ त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी राखीव बेडची संख्या वाढविण्याची वेळ पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्थेवर आली आहे़
----------------------
महापालिकेने बोलविली खाजगी रूगणालयांची बैठक
पुणे महापालिकेने कोरोनाबाधितांची संख्या पाहता बेड वाढविण्यासाठी, सोमवारी (दि. २२ मार्च) शहरातील मोठ्या खाजगी रूग्णालय प्रमुखांची बैठक बोलविली आहे़ यामध्ये कोरोनाबाधितांसाठी राखीव बेडची संख्या वाढविण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे़
दरम्यान सोमवारपासून जम्बो हॉस्पिटल महापालिका सुरू होत असून, येथे १०० साधे बेड व दीडशे आॅक्सिजन बेड नव्याने सुरू होणार असून, टप्प्या-टप्प्याने याची क्षमता वाढविण्यात येणार आहे़ तसेच रविवारीच महापालिकेने दळवी हॉस्पिटलमध्ये आणखी २५ आॅक्सिजन बेड सुरू केले असल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ़ अंजली साबणे यांनी दिली़
-----------------------------\