कदमवाकवस्ती परिसरातील व्हेंटिलेटर्स बेडसाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तत्काळ तो भरला जातो. हवेेली तालुका सोडून बाहेरूनही मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
पूर्व हवेली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
अनेक खासगी रुग्णालये बेड लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक नेते यांच्या संपर्कातील रुग्णांना देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी धावाधाव करावी लागत आहे. तालुक्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन उपलब्ध ऑक्सिजन बेड कमी पडायला लागले आहेत. यामुळे कोविड केअर सेंटर लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत करण्याची गरज रुग्णांमधून व्यक्त होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने रुग्णांना उपचार करणे कठीण होत आहे. खासगी दवाखान्यांत सर्वच बेड फुल होत आहेत.
--
रेमडेसिविर इंजेक्शन
--
कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण पुणे शहरात ऑक्सिजन बेडसाठी शोधमोहीम राबवावी लागत आहे. कोरोनाची अतितीव्र, तीव्र लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची शिफारस मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र बाजारात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक धावपळ करावी लागत आहे. उरुळी कांचन व परिसरातून रोज वीस ते पंचवीस रुग्णांचे नातेवाईक रात्री-अपरात्री रेमडेसिविर इंजेक्शन पुणे शहर व पिंपरी-चिंचवड हद्दीत हेलपाटे मारत असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुनही इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आपले पेशेंट मरेल या भीतीने पळापळ करत असल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसत आहे.
--