बारामती: विलगीकरण व्यवस्थितरीत्या होत नसल्याने संपूर्ण कुटुंब संक्रमित होत आहेत. त्यामुळे गावातील कोरोना संक्रमित संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची भीती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.
पिंपळी येथे उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी भेट देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी कांबळे यांनी बोलतानाही भीती व्यक्त केली. या वेळी कांबळे पुढे म्हणाले की, पिंपळी गाव कोरोना हॉटस्पॉट बनत चालले आहे. ही बाब चिंतेची असून सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे. रुग्णालयात, कोरोना सेंटरमध्ये विलगीकरणसाठी बेड शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे गावात हायरिस्क लिस्टमध्ये व नॉर्मल असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाची यादी तयार करण्यात यावी. त्यांची आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी तपासणी करून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे, असेही कांबळे म्हणाले.
बाधित रुग्ण आढळल्यास घरात विलगीकरण न करता तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आग्रही राहावे. पदाधिकारी, स्वयंसेवक आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, आशासेविका यांच्यात समन्वय असावा त्यामुळे कोरोना साखळी खंडित करता येईल व आपले गाव कोरोनामुक्त होईल असे कांबळे म्हणाले. या वेळी लसीकरण नियोजनबद्ध पध्दतीने केल्याबद्दल पिंपळी आरोग्यवर्धनी विभागाच्या डॉ. दीपाली शिंदे व त्यांचे सहकाऱ्यांचे कौतुक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले.
या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, छत्रपती कारखाना संचालक संतोष ढवाण, बारामती खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुनील बनसोडे, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर, प्रभारी ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे, सदस्या स्वाती ढवाण, आबासाहेब देवकाते, अजित थोरात, उमेश पिसाळ, वैभव पवार, अशोकराव ढवाण, हरिभाऊ केसकर,अशोकराव देवकाते, पप्पू टेंबरे, खंडू खिलारे आदी उपस्थित होते.
पिंपळी येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी भेट देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
०८०५२०२१ बारामती—०५