राहुल शिंदे - पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसत असून व्हिसा मिळत नसल्यामुळे इराकमधील एका विद्यार्थ्याला पीएच.डी.ची मौखिक परीक्षा (व्हायवा) देण्यासाठी भारतात येता आले नाही. त्यामुळे विद्यापीठाची परवानगी घेऊन या विद्यार्थ्याला गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने ‘स्काईप’द्वारे पीएच.डी.ची मौखिक परीक्षा द्यावी लागली.कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या देशातील नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया थांंबविण्यात आली आहे. इराकमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने इराकमधील नागरिकांना भारतात येण्याबाबत बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात पीएच.डी. करणाऱ्या इराक देशातील बगदाद येथील अब्बास अदिल इब्राहिम या विद्यार्थ्याची मौखिक परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे त्याला प्रत्यक्षात पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेला प्रत्यक्षात उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे ई-मेलद्वारे विनंती केली. कुलगुरूंनी ही विनंती मान्य केली. त्यामुळे गुरुवारी या विद्यार्थ्याने तज्ज्ञ समितीसमोर मौखिक परीक्षा दिली.अब्बास इब्राहिम या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात ३ ऑक्टोबर २०१६मध्ये पीएच.डी.साठी नोंदणी केली होती. त्याने तीन वर्षांत ‘ए स्टडी ऑफ एव्हल्युवेशन ऑफ प्रोफेशनल प्रॅक्टिसेस अॅण्ड इथिक्स सिस्टीम अडॉप्टेड बाय चार्टर्ड अकाउंटंट्स इन पुणे रिजन’ या विषयावरील पीएच.डी.चा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्याला संगमनेर येथील संगमनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. गुरुवारी अब्बास याच्या मौखिक परीक्षेस बाह्य परीक्षक म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रमोद बियानी, विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील आणि प्रा. डॉ. जी. शामला उपस्थित होते.अब्बासचे मार्गदर्शक डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व अधिष्ठाता यांनी विद्यार्थी हिताचा विचार करून ऑनलाईन मौखिक परीक्षा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे गुरुवारी अब्बास पीएच.डी.ची मौखिक परीक्षा देऊ शकला. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने मौखिक परीक्षा देणारा अब्बास हा पहिला विद्यार्थी आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने चार्टर्ड अकाउंटंट्स यांच्याकडून महत्त्वाची माहिती गोळा करून पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. तसेच, परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अब्बासने केलेल्या सादरीकरणावर परीक्षकांनी समाधान व्यक्त केले. तसेच अब्बास याला पीएच.डी. पदवी देण्याबाबत विद्यापीठाकडे शिफारस करणार असल्याचे सांगितले.
कोरोनाचा फटका : व्हिसा न मिळाल्याने इराकच्या विद्यार्थ्याची पीएच. डी.ची ‘ऑनलाईन परीक्षा’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 7:00 AM
इराक देशातील बगदाद येथील विद्यार्थ्याची घेतली जाणार होती मार्च महिन्यात मौखिक परीक्षा
ठळक मुद्देविद्यार्थ्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली ई-मेलद्वारे विनंती