पुणे : कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे २२ रुग्ण देशात सापडले असून, यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांची चिंता वाढली आहे. डेल्टाच्या तुलनेत डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक वेगाने संसर्ग पसरवणारा आणि धोकादायक असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जीनोम सिक्वेन्सिंग वाढवणे, लसीकरण झाल्यावर पॉझिटिव्ह येणारे रुग्ण, कोरोनाची पुन्हा लागण होणारे रुग्ण यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याचप्रमाणे आयएलआय आणि सारीच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात आता ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने नवे संकट निर्माण केले आहे. व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांनी कुठे प्रवास केला. त्यांचे लसीकरण झाले होते का, कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का? ही माहिती तपासून पाहिली जात आहे. पुणे जिल्ह्यात अद्याप ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास ‘डेल्टा’ व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. कोरोना व्हायरसमधील डबल म्युटेशन सर्वांत आधी महाराष्ट्रात आढळून आले होते. ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे पुढील सहा-आठ आठवड्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------
कोरोनाचे एकूण रुग्ण - 1043064
बरे झालेले रुग्ण - 1016922
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - 8493
कोरोना बळी - 17649
चाचण्या - 18509
-----
जिल्ह्यात काय खबरदारी?
पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हॅली यांचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही, मात्र जीनोम स्क्विन्सिंग मध्ये पुण्यातील नमुनेही पाठवले जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे ‘आयएलआय’ आणि ‘सारी’ रुग्णांचेही सर्वेक्षण केले जात आहे. लसीकरणानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी
-----
पहिल्या लाटेत युकेवरून आलेल्या अल्फा व्हेरियंटने संसर्ग पसरवला. अल्फामध्ये म्युटेशन होऊन डेल्टा तयार झाला. दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटने अक्षरशः हैदोस घातला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला, ऑक्सिजनवर असणाऱ्यांचे, आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही खूप जास्त होते. डेल्टामध्ये आणखी म्युटेशन होऊन डेल्टा प्लस
व्हेरियंट समोर आला आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग आणखी तीव्र स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे लसीकरणाचा वेग अतिशय जलद गतीने वाढवणे आवश्यक आहे. केवळ एखादा दिवस ८४ लाख लोकांना लसीकरण करून नंतर पुन्हा वेग कमी होण्यात अर्थ नाही. दररोज एक कोटी लोकांना लसीकरण होणे गरजेचे आहे. पुढील सहा ते आठ आठवड्यांत तिसरी लाट येणार असल्याची शक्यता गृहीत धरली, तरी तोपर्यंत ४० कोटी लोकांचे लसीकरण होऊ शकते. डेल्टा प्लस विरोधात लसींची परिणामकारकता ६० ते ६५ टक्के असू शकते. लसीकरणाबरोबरच मास्कचा अनिवार्य वापर, गर्दी टाळणे याबाबत आता वारंवार सांगावे लागू नये. कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्री आपणहून लोकांच्या कृतीत उतरणे आवश्यक आहे.
- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ