राहुल शिंदे -
पुणे : टेमघर धरण दुरुस्तीच्या कामात कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे यंदाही धरण दुरूस्तीचे काम अपूर्ण राहणार आहे.परिणामी पुन्हा दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ घ्यावी लागणार आहे.तसेच फेब्रुवारी -मार्च २०२१ मध्ये धरण रिकामे करावे लागणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले .परंतु, गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.मात्र सुमारे दोन-अडीच वर्षांपासून धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली होती. त्यामुळे एप्रिल 2020 मध्येच धरणाच्या दुरुस्तीचे काम शंभर टक्के पूर्ण होण्याची अपेक्षा होती. खडकवासला धरण प्रकल्पातील महत्त्वाचे धरण आणि पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणा-या टेमघर धरणाची दुरुस्ती लवकर व्हावी यासाठी जलसंपदा विभागाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, धरणाच्या दुरुस्तीला वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे धरण दुरुस्तीचे काम रखडले आहे.जलसंपदा विभागातर्फे यंदा 28 फेब्रुवारी रोजी टेमघर धरण दुरुस्तीच्या कामासाठी शंभर टक्के रिकामे करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार होते. परंतु ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी व लोक डाऊनमुळे धरण दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. सुमारे एक महिना दुरुस्तीचे काम पूर्णपणे बंद ठेवावे लागले. मात्र, अत्यावश्यक काम असल्याने शासनाच्या परवानगीने ३३ टक्के कर्मचारी घेऊन फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. काम सुरू झाले तरी काम करताना पेट्रोलचा तुटवडा भासू लागला.तसेच दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे केमिकल मुंबईत अडकून पडले होते, यातून मार्ग काढत धरणाच्या ग्राऊटींगचे काम पूर्ण करण्यात आले. शॉर्ट फिटचे 70 टक्के कामही पूर्ण झाले आहे. तसेच मे महिना अखेरपर्यंत आणखी काही कामे पूर्ण केली जाणार आहेत.----------- खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण पूर्णपणे रिकामे करावे लागते. त्यामुळे उर्वरित तीन धरणांमधील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. 2019 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे पुणेकरांना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळीही धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.