पुणे : संपूर्ण जगासह कोरोना आपत्तीचे सावट गेल्या नऊ महिन्यापासून पुणे शहरावरही अजून कायम आहे़ त्यातच सर्वाधिक रूग्ण संख्या म्हणून पुणे शहराची ओळख झाल्याने, या संकट काळात आलेल्या अनुभवातून तथा विविध आव्हांनामधून धडा घेत पुणे महापालिकेने शहराचे वैद्यकीय धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे़
कोरोना आपत्तीतील अनुभवाच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शहराचे वैद्यकीय धोरण ठरविण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते़
आरोगय अधिकारी डॉ़ आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या धर्तीवर पुण्याचे वैद्यकीय धोरण ठरविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे़ यात आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याबरोबरच, वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारणे, आवश्यक मनुष्यबळ तयार करणे अशा विविध विषयांवर अभ्यास करून धोरण निश्चिती केली जाणार आहे़ सदर बैठकीत शहराच्या वैद्यकीय धोरणाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली असून, पुण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचे सर्वंकष वैद्यकीय धोरण ठरविण्यात येणार आहे़
हे वैद्यकीय धोरण निश्चित करताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, शहरवासीयांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यातून आरोग्य यंत्रणेतील नेमक्या उणीवा स्पष्ट होणार असून, वैद्यकीय धोरण ठरविताना त्या भरून काढण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही डॉ़ भारती यांनी सांगितले़
----------------------------------