पुणे : कोरोनामुळे शाळा बंद असून यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु, त्याचा परिणाम पुस्तकखरेदीवर होत असल्याचे दिसून येत आहे. सुमारे ६० ते ७० टक्के पालकच आपल्या पाल्यांसाठी नवीन पुस्तके खरेदी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा पुस्तकखरेदीवर परिणाम झाला असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा मंगळवारपासून (दि. १५) ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहेत. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील पालकांनी सोमवारी अप्पा बळवंत चौकातील पुस्तकविक्री दुकानांत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. काही पालक मास्कशिवाय दुकानांमध्ये फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाविषयक नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालक विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, रेनकोट, छत्री, जेवणाचा डबा आदी वस्तूही खरेदी करतात. मात्र, सध्या केवळ ऑनलाइन शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या दुकानांकडे पालक फिरकतही नाहीत. ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू असताना विद्यार्थी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही करतात. परंतु, घरीच बसून अभ्यास करायचा असल्यामुळे वह्या व इतर स्टेशनरी खरेदीवरसुद्धा परिणाम झाला आहे.
-------------
कोरोनाचा परिणाम पुस्तकविक्रीवर दिसून येत आहे. बाजारात सुमारे ६० ते ७० टक्के चालक पुस्तक खरेदीसाठी आले आहेत. मंगळवारी शाळा सुरू होणार आहेत. तरीही अनेक पालकांनी अद्याप आपल्या पाल्यांसाठी पाठ्यपुस्तकांची खरेदी केली नसल्याचे दिसून येत आहे.
- किशोर पंड्या, पुस्तकविक्रेते
-----------------------