पुणे : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आजवरच्या रुग्णवाढीच्या दरामध्ये सर्वात निचांकी दर शुक्रवारी पहायला मिळाला. सप्टेंबरमध्ये ३२ टक्क्यांवर गेलेला रुग्णवाढीचा दर शुक्रवारी ६.५१ टक्क्यांवर आला. रुग्णवाढीचे प्रमाण घटत असल्याने नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला असून नागरिकांनी अधिक काळजी घेतल्यास हा दर आणखी खाली जाऊ शकतो.
शहरात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णवाढ झपाट्याने वाढत गेली. दिवसागणिक वाढत गेलेल्या रुग्णांसह पालिकेने तपासण्यांचे प्रमाणही वाढविले. तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये तब्बल ३२ टक्क्यांपर्यंत गेले होते. शहरातील कोरोनासाथीचा सर्वाधिक प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यात पहायला मिळाला. गणेशोत्सव काळातील गर्दी कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे निष्कर्ष आरोग्य विभाग आणि प्रशासनाने काढले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आली.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकेल असा अंदाज बांधण्यात आला होता. तशी शक्यता केंद्रिय पथकासह राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही वर्तविली होती. परंतु, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुस-या आठवड्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. तपासण्यांची संख्या वाढविण्यात आलेली असतानाही रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण मात्र घटत गेले आहे.
====
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा टक्क्यांच्या खाली आलेला रुग्णवाढीचा दर ८ डिसेंबर रोजी ११.५१ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर तो सलग खाली आहे.
====
रुग्णवाढीच्या दराची टक्केवारी
तारीख तपासण्या रुग्ण टक्केवारी
७ डिसेंबर १९११। २०२। १०.५७
८ डिसेंबर २४२५। २७९। ११.५१
९ डिसेंबर ३७०८। ३३८। ९.१२
१० डिसेंबर ३७९५। २५८। ६.८०
११ डिसेंबर ६.५१