कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यानंतर मनात एक प्रकारची भीतीच निर्माण होते, त्यातही आपला कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पायाखालची जमीनच सरकते. परंतु वैद्यकीय उपचार, ज्येष्ठ मुलीचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील सदस्यांच्या वज्र निर्धारापुढे अखेर कोरोनानी माघार घेतली.
बोडके कुटुंबांमध्ये नारायण बोडके, वय ७२ वर्षे, सेवानिवृत्त, पत्नी विमल बोडके, वय ६५ वर्षे, मुलगा गणेश (वय ३८), मुलगा रमेश (२९), सून प्रतिभा (वय ३५) व नातू अंश (वय १०) अशा पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र अवघ्या १५ दिवसात बोडके परिवारातील सदस्यांची लक्षणे कमी होऊन या सर्वांनी घरीच राहून कोरोनावर यशस्वी मात केली.
कोट
माझे वडील नारायण बोडके यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच त्यांना कफ झाला होता आणि अंगात अशक्तपणाही जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. तसेच सिटीस्कॅन स्कोअर १० आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आमची वणवण सुरू केली. दरम्यान बेड व दवाखान्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने संपर्कातील डाॅक्टर आणि नातेवाईकांनी सर्व परिस्थिती समजावून सांगत धीर दिला आणि त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वडीलांनी १५ दिवस घरीच राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारानंतर कोरोनावर मात केली असून कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा कोरोनामुक्त झाले आहेत.
- गणेश बोडके, आंबेगाव, बुद्रुक, (मुलगा)
फोटो ओळ - आंबेगाव बुद्रुक परिसरातील कोरोनामुक्त झालेला बोडके परिवार.