पुणे : कोरोना विषाणुची लागण झालेल्या एका पन्नास वर्षीय महिलेचा गुरूवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दोनवर पोहचला आहे. या महिलेला परदेश प्रवासाची कसलीही पार्श्वभूमी नाही. तसेच तिला अन्य कोणताही आजार नव्हता, अशी माहिती ससून रुग्णालयाकडून देण्यात आली. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा ३० मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा पुण्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. या व्यक्तीला मधुमेह व अन्य आजारही होते. पण गुरूवारी मृत्यू झालेल्या ५० वर्षीय महिलेला अन्य कोणताही आजार नव्हता.
ही महिला दि. १ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिला न्युमोनिया असल्याचे निदान झाले होते. तसेच तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरूवारी मिळाला. तर सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही महिला रविवार पेठ भागातील आहे.ससून रुग्णालयामध्ये आली तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयात येण्यापुर्वी ती परिसरातील अन्य रुग्णालयांमध्ये गेली असावी. प्रकृतीत अधिक बिघडत गेल्याने ससूनमध्ये दाखल करण्यात आले. तिला अन्य कोणताही आजार नसला तरी उपचाराला विलंब केल्याने न्युमोनियामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिच्या कुटूंबासह अन्य संपर्कातील व्यक्तींना शोध घेतला जात असून त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.