पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. यावर लॉकडाऊन हा पर्याय नाही, म्हणून कठोर निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे जाहीर केले आहे. मात्र, नागरिकांकडून निर्बंधांचे प्रभावी पालन होत नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले.
एकीकडे वाढत्या रुग्णांची संख्या सरकारची डोकेदुखी ठरत आहे, तर दुसरीकडे प्रतिबंधक उपायांवर नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. विवाह समारंभ, हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थित राहण्याचे बंधन टाकले आहे. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या अल्प प्रमाणात दिसून आली. तर काही भागांत चित्रपटगृहे बंद असल्याचे दिसून आले. तर मॉलमधील चित्रपटगृहांमध्येही गर्दी नसल्याचे दिसून आले.
चौकट
गर्दीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. एका विवाह समारंभात आवश्यकतेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने एका मंगल कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर हॉटेल वेळेवर बंद करणे तसेच ५० टक्के उपस्थितीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोठे काय आढळले
१) चित्रपटगृहे
चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपट लागला नसल्याने प्रेक्षकांचा प्रदिसाद नाही. तसेच कोरोनाचे सावट अजूनही सरले नसल्याने प्रेक्षक येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
२) विवाह समारंभ
विवाह समारंभाच्या गर्दीवर नियंत्रण राखणे तेवढ्या प्रमाणात शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपस्थिती वाढत आहे. तसेच लग्न सोहळ्यावर कारवाई होण्याचे अल्प प्रमाण आहे. काही वेळा दोन सत्रांत भेटून जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येते.
३) अंत्यविधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे काही अंशी गर्दी दिसून येते. सुरक्षित अंतरदेखील पाळण्यात येते. काही वेळा गर्दी होत असल्याने नियम पाळले जात नाहीत, असे दिसून आले.
४) कार्यालये
सरकारी तसेच खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र अजूनही या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. सरकारी कार्यालयांना आदेश मिळाला आहे. मात्र नियमावली जाहीर केली नसल्याने नियम पाळले जात नाहीत, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर खाजगी कार्यलयांमध्ये अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचे सांगण्यात आले.
५ ) गृहविलगीकरण
जे पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेतात आणि तशी परवानगी मिळाली असल्यास महापालिकेकडून रुग्णाच्या घरावर विलगीकरणाचे स्टिकर लावण्यात येतात. तसेच त्यांच्यावर लक्षदेखील ठेवण्यात येत. असे असले तरी किमान दिवसांच्या विलगीकरणाचा नियम पाळत नसल्याचे दिसून आले. जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर समज दिले जाते किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.