आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांनाही कोरोना प्रतिबंधक लस टोचली जात आहे. सर्व काही सुरळीत अर्थात निर्धारित वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार पार पडले तर पुढील काही महिन्यांतच देशातील बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होणार आहे. परंतु एक चिंतेचा विषय म्हणजे १८ वर्षांखालील मुलांचे कोरोना लसीकरण. ही मुले अजूनही कोरोना लसीकरण मोहिमेपासून वंचित आहेत. कारण, आपल्या देशात अद्याप लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक निशाण्यावर असणार आहेत. त्यामुळे अभ्यासानुसार लहान मुलांमधील कोविड तुलनात्मकदृष्ट्या त्रासदायक असेल. पण आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार याची तीव्रता अजून काळजी करण्यासारखी नसली, तरी आपल्याला दुर्लक्ष करताही येणार नाही.
जवळ जवळ ९० ते ९५ टक्के केसेसमध्ये रुग्ण हे विनालक्षणे म्हणजेच (asymptomatic) अथवा सौम्य लक्षणे असतात. त्यांना योग्य उपचार देऊन घरीच आयसोलेट केले जाऊ शकते. ५ टक्के केसेसमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत. अशा रुग्णांना बालरोग कोविड केअरमध्ये ठेवावं लागते. MIS-C म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गंभीर आजाराचे प्रमाण लाखात १ किंवा २ असे आहे. पण वेळीच लक्षणे ओळखल्यास त्यावर मात करता येऊ शकते. त्याचप्रमाणे कोणत्याही गंभीर आजारावर मात करण्यासाठी आपण आधीच तयार असले पाहिजे. त्यामुळे पुढील धोक्यांचा विचार करता आयपीडी व आयसीयू बेड सह तयार राहिले पाहिजे.
अलीकडेच महाराष्ट्र टास्क फोर्सने सरकारला इन्फ्लूएन्झा लस असलेल्या प्रत्येक मुलाचे लसीकरण करण्याचे आवाहन केले.
फ्लू आणि कोविड वेगवेगळ्या विषाणूंमुळे उद्भवतात आणि फ्लूच्या लसींमुळे कोविडपासून थेट संरक्षण मिळते असे सूचित करणारा पुरावा नाही. जर आपण फ्लू लस असलेल्या मुलांना लसीकरण केले तर मुले गंभीर आजारी किंवा इन्फ्लूएन्झाने रुग्णालयात दाखल होण्याची प्रकरणे कमी होतील. यामुळे, रुग्णालयांना दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवणे सोपे जाईल.
लाट येईल की नाही हे जरी सौम्य किंवा तीव्र असेल यापेक्षा आपण काळजी घ्यावयाची आहे. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा. तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.
- डॉ. अमिता फडणीस