लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही गेल्या दोन दिवसांत साडेतीन हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, यापैकी अनेक जण हे कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले अथवा लक्षणेविरहित असल्याने, बहुतांशी म्हणजेच तीन हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्णांनी गृहविलगीकरणासच प्राधान्य दिले आहे़
कोरोनाबाधित रुग्णांना (क्वारंटाइन सेंटर) विलगीकरणासाठी महापालिकेने रुग्णालयात राहावे अथवा घरी विलग राहण्याची सुविधा असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन, इतरांच्या संपर्कात येणार नाही व आपल्यामुळे संसर्ग वाढणार नाही, असे हमीपत्र देणे बंधनकारक केले आहे़ तर तपासणी केल्यावर तपासणी अहवाल येईपर्यंत इतरांपासून विलग राहण्याच्या सूचना केल्या आहेत़
सद्यस्थितीला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असला तरी, यापैकी अनेक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले व लक्षणेविरहित असल्याने ते गृहविलगीकरणाचे पर्यायच हमीपत्र देऊन स्वीकारत आहेत़ त्यामुळे शहरात सध्या तरी महापालिकेला क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याची गरज आलेली नाही़
महापालिकेने वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्षकनगर व पठारे स्टेडियम येथील क्वारंटाइन सेंटर सज्ज ठेवली असून, येथे ५०० कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, अशी व्यवस्था केली आहे़ सध्या ज्या रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता आहे, अशी संख्या कमी असल्याने, महापालिकेच्या बाणेर येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालय, लायगुडे रुग्णालय, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय येथे पाठविण्यात येत आहे़