प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या: एकाच दिवसात आढळले ३८८ कोरोनाबाधित
बारामती : बारामती शहरात बुधवार (दि.२१) च्या प्रतीक्षेतील अहवालासह गेल्या ४८ तासांत पुन्हा ३८८ एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बारामतीकर पुन्हा हादरुन गेले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध असूनदेखील कोरोनाची आकडेवारी वाढतच असल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढत आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी आता दवाखान्यांची क्षमता संपण्याच्या मार्गावर आहे.
बारामती शासकीय रुग्णालयांसह येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण भरती करण्याची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. बुधवारी (दि.२१) च्या प्रतीक्षेत असलेल्या २३८ जणांपैकी शहरातील ४१ आणि ग्रामीणमधील ३९ रुग्णांसह एकूण ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांत एकूण आरटीपीसीआर नमुने ५३० तपासण्यात आले. त्यापैकी एकूण बारामतीमधील १९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण - २१ आहेत. काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह - ६६आहेत. कालचे एकूण अंॅटिजेन २९३. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१२४ आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३८८ आहेत. यामध्ये शहर-१८२ ग्रामीण- २०६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या-१४ हजार ७७०वर पोहचली आहे. तर एकूण बरे झालेले रुग्ण- ११ हजार २५६ वर गेले आहेत.
बारामतीत गेल्या ४८ तासांपूर्वी एकाच दिवशी ३९५ एवढ्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. या धक्क्यातुन बारामतीकर सावरण्यापुर्वीच आज पुन्हा ३८८ एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बारामती पुन्हा हादरली आहे. बारामतीत राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे.