पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या दरपत्रकानुसार ‘सीरम’ची कोविशिल्ड लस राज्यांना ४०० रुपयांना दिली जाणार होती. त्यावरून राज्यांकडून मोठा आक्षेप घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयांत हीच लस ६०० रुपयांना उपलब्ध होणार होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली ही कोरोना प्रतिबंंधक कोविशिल्ड लस ‘सीरम’तर्फे भारतात उत्पादित करण्यात येत आहे.
तिची किंमत कमी करण्याचा हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. पूनावाला यांनी म्हटले आहे, की राज्यांसाठी किंमत कमी करत आहोत. हा निर्णय तातडीने लागू करण्यात येईल. त्यामुळे राज्यांचा काही हजार कोटी निधी वाचू शकेल व असंख्य जणांचे प्राण वाचण्यास मदत मिळेल.
वाय दर्जाची सुरक्षा लसीकरण मोहिमेत महत्त्वाची
भूमिका बजावणाऱ्या दोन लसींपैकी कोविशिल्ड या लसीची उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीइओ अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने घेतला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान पूनावाला यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतील.