पुणे : दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिकी जमात मरकजचे लोण पुण्यातही पोचले असून या कार्यक्रमाला गेलेल्यांपैकी पुण्यातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोंढव्यातील एका ६१ वर्षीय व्यक्तीकडून त्यांच्या तीन वर्षाच्या नातीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात एकाच दिवसात सात जण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील १३६ जण या तबलिकी जमातच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यातील ४९ जण पुणे शहरातील होते. त्यापैकी ४६ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यातील ४२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून तिघाजणांना कोरोना झाला आहे. पिंपरीमध्ये यापुर्वीच मरकजला गेलेले दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यात आता पुण्यातील तिघांची भर पडली आहे. या मरकजला गेलेल्या दोघाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कोंढव्यातील दोघांचा समावेश आहे.
मरकजमध्ये सहभागी झालेल्या दोघा जणांव्यतिरीक्त शहरातील आणखी पाचजणांना कोरोना झाल्याचे गुरुवारी आलेल्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या सातजणांमध्ये कोंढव्यातील ६१ वर्षीय ज्येष्ठासह त्याच्या तीन वर्षांच्या नातीचा समावेश आहे. यासोबतच कोंढव्यातीलच २० वर्षीय तरुणालाही लागण झाली आहे. तर, स्वारगेट येथील ६५ वर्षीय महिला, घोरपडे पेठेतील ६५ वर्षीय आणि भवानी पेठेतील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा यामध्ये समावेश आहे. तर बाणेर येथील ४० वर्षीय तरुण संक्रमित झाला आहे. बुधवारी कोंढव्यातीलच ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. तसेच जुन्नरची ६३ वर्षीय महिलाही संक्रमित असल्याचे समोर आले होते. दोन दिवसात नऊ रुग्णांची वाढ झाली आहे.
शहरात राज्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. सिंहगड रस्त्यावरील हे दाम्पत्य ९ मार्च रोजी डॉ. नायडू रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. त्यांच्या उपचारानंतरच्या चाचण्या निगेटीव्ह आल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. यानंतर, त्यांची मुलगी, कॅब चालक, सह प्रवासी, अंगणवाडी सेविकेसह आणखी एक महिला असे शहर आणि जिल्ह्यातील नऊ जण कोरोनामुक्त होऊ न घरी गेले. या काळात खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला एक रुग्ण दगावला. एकीकडे सकारात्मक चित्र दिसत असतानाच रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे.
आजोबाकडून नातीला संक्रमणकोंढव्यातील ६१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या घरातील अन्य लोकांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नाहीत. परंतू, या व्यक्तीची तीन वर्षीय नात मात्र आजोबाकडूनच संक्रमित झालेली आहे.