पुणे : शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. नायडू रुग्णालयात आतापर्यंत १८० जणांची तपासणी झाली असून त्यातील १२४ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५१ जण निगराणीखाली आहेत. पालिकेचे १४३ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याच्या संपर्कात आलेले ४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने ‘निगेटिव्ह’ असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्यानंतर महापौरांनी पालिका प्रशासन, पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनू गोयल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह पालिकेतील पक्षनेते, विविध विभागांचे विभागप्रमुख, ससून रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते. शहरात विदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या विलगीकरणासाठी २५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणांवर कोरोनाची लक्षणे नसलेल्याच व्यक्ती ठेवण्यात येणार असून लक्षणे असलेल्या व्यक्तींना डॉ. नायडू रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे. परदेशातून आलेले नागरिक घरी गेले असले तरी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका उपायुक्त व सहायक आयुक्तांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याच्या सूचना केल्या असून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली नसून कार्यक्रम शक्यतो घेऊ नयेत असे आवाहन केले आहे. पालिकेने जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. महापौर चषक स्पर्धेतील उर्वरीत स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून पालिकेचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचे महापौरांनी सांगितले. =====बाधित दाम्पत्याच्या घराजवळील तीन किलोमीटरच्या परिघातील ६५० घरांमधील नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तुर्तास तरी धोकादायक काहीही आढळले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Coronavirus : दुबई रिटर्न ‘त्या’ दाम्पत्याच्या संपर्कातील ४४ नागरिक ‘निगेटिव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 8:07 PM
डॉ. नायडू रुग्णालयात आतापर्यंत १८० जणांची तपासणी झाली असून त्यातील १२४ नागरिकांना सोडले घरी
ठळक मुद्देमहापौरांकडून आढावा बैठक : पालिकेचे एकूण १४३ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तैनातशहरात विदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी पुणे पालिकेचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द