पुणे - कोरोनापासून दूर असलेल्या आंबेगाव तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा दुसरा रुग्ण आढळला. शिनोली (ता.आंबेगाव) येथील हा रुग्ण असून त्याचे वय ५० आहे. तो मुंबईत कॅब चालवत होता. १६ तारखेला घाटकोपर येथून शिणोलीला आला होता. त्याला १७ तारखे पासून त्रास सुरू झाला. कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने त्याच्या स्वबचे नुमने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले होते
दि. २१ रोजी रात्री उशिरा त्याचा कोरोना चाचणी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्या बरोबर शिनोली गाव पूर्ण बंद करण्याचे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. हा रूग्ण शिनोली गावठाणात आई वडिल व भावासह रहात होता. त्यामुळे अनेकांना भेटला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आंबेगाव मध्ये यापूर्वी साकोरे येथे एक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. आता हा दुसरा रुग्ण मिळाला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरू लागले आहे. हा देखिल मुंबईकर असल्याने मुंबईकरांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचे दिसू लागले आहे. यासाठी गावात आलेल्या मुंबईकरांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.