बारामती : शहरातील श्रीरामनगर परीसर पोलीसांनी रविवारी (दि २९) दुपारी १२ पासुन क्वारंटाईन केला आहे.येथील संपुर्ण परीसर क्वारंटाईन केल्याने नागरीकांना घरातच थांबणे बंधनकारक केले आहे.त्यासाठी संपुर्ण परीसर सील करण्यात आला आहे. येथील एका रिक्षाचालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची रवानगी नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या तपासणीचा अहवाल मिळाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दक्षता घेण्यासाठी हा परीसर पोलीसांनी क्वारंटाईन केला.
बारामती शहरातील श्रीरामनगर,त्रिमुर्तीनगर परीसर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या ठिकाणी रहीवाशांना घराबाहेर येण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीसांनी संपुर्ण परीसर क्वारंटाईन केल्याचे घोषित केले आहे. कोरोनासदृश्य लक्षणे आढळलेल्या रिक्षाचालकाची नायडूमध्ये रवानगी करण्यात आली आहे. बारामतीमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती अद्याप खात्रीशिर नाही. याबाबतचे वैद्यकीय तपासणी सुरु आहे.त्याचे अहवाल आलेले नाहीत.त्यामुळे नागरीकांनी अफवा पसरवू नये, असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
शहरातील श्रीरामनगर येथील रिक्षाचालकाला आठ दिवसांपासुन ताप,सर्दी,खोकल्याचा त्रास होता.त्यासाठी शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी(दि २८) रात्री त्याला कोरोना तपासणीसाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.मात्र, प्रशासनाच्या माहितीनुसार कोरोनाबाधित आहे की नाही याचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाहीत. बारामती नगरपालिकेच्या वतीने या भागात तातडीने निजंर्तुकीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. पोलिस कर्मचा-यांनी तातडीने या भागात स्पीकरवरुन परीसर क्वारंटाईन केल्याची घोषणा करीत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.