पुणे ; चीनमधून जगभरातील अनेक देशांमध्ये पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झाला आहे. त्यातही महाराष्ट्रात पहिल्यांदा पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. सध्या पुण्यात १० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून ही संख्या अधिक होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. अशावेळी नागरिकांनाजी अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सॅनिटायरझर वापरणे, मास्क वापरणे, दुसऱ्यापासून सुरक्षित अंतर राखणे असे उपाय नागरिकांना सांगितले जात आहेत. असाच एक भन्नाट उपाय पुण्यात एका रिक्षावाल्याने अमलात आणला आहे.
ही गोष्ट आहे इब्राहिम तांबोळी या रिक्षाचालकाची. इब्राहिम तांबोळी हे पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून रिक्षा चालवतात. त्यांची रिक्षा हरित रिक्षा म्हणून संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्यांनी कोरोनाशी लढा देणारी यंत्रणाच रिक्षात बसवली आहे. त्यांच्या या रिक्षाचे कौतुक संपूर्ण पुणे शहरात होत आहे. त्यांनी रिक्षात व्हेपोरायझर (वाफेचे यंत्र ) बसवले आहे. त्यातून प्रवाशांना शुद्ध हवा दिली जाते. शिवाय रिक्षात बसल्यावर त्यांनी स्प्रे ठेवला असून त्यातून येणाऱ्या पाण्यात सॅनिटायझर मिसळले आहे. इतक्यावर न थांबता पैसे घेतानाही ते आधी सॅनिटायझर वापरतात आणि प्रवाशालाही देतात. कोरोनासाठी भीती न बाळगता त्याविरोधात वैज्ञानिक पद्धतीने लढा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे.
याबाबत लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, 'कोरोना हा काही असाध्य आजार नाही. मात्र तो अधिक पसरू नये म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे. फक्त स्वतःची नव्हे तर समोरच्या व्यक्तीचीही काळजी घेण्याची गरज आहे. असे केले तरच आपण कोरोना दूर करू शकतो. त्यामुळे मी माझ्यापुरता किंवा माझ्या परिवारापुरता विचार न करता माझ्या प्रवासी परिवाराचा विचार केला. दररोज लोकांशी संपर्क येणाऱ्या प्रत्येकानेच अशी काळजी घेतली तर कोरोना शिल्लकही राहणार नाही'.