पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा, सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कामे घरातून करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे.
कोरोनाविषयी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाचे वेगळ्या प्रकारचे संकट आहे. गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे. लग्न असो की कोणतेही कार्य, दहावे-तेरावे कार्य असले तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले.
याचबरोबर, गर्दी कमी झाली नाही तर मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करावी लागणार आहे. तसेच, कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीने वागावे. हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे खासगी आस्थापने बंद करावी, अशी विनंती अजित पवार यांनी केली.
यावेळी अजित पवार यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
काय म्हणाले अजित पवार?- राज्यात 52 कोरोनाचे बाधित रुग्ण आहेत.- पुणे जिल्ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.- 31 मार्चला कोणतेही आदेश घडणार नाही, पुढचे आदेश निघेपर्यंत सर्व निर्णयांची अंमलबजावणी सुरू होईल.- अंत्यविधी,दहावा, तेराव्याला गर्दी करू नका. बाबांनो गर्दी टाळा 25 लोकांत लग्न कार्य करा. ग्रामीण भागात घरापुढे मांडव टाकून गर्दीत लग्न करत आहेत. असं करू नका. तमाम नागरिकांना आवाहन गर्दी करू नका. - लोकल, सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी आहे. मात्र तरीही गर्दी होत असेल तर बंद करावी लागेल. असा निर्णय फक्त मुंबईत नाही तर पुण्यातही होऊ शकतो.- डॉक्टर, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्सेस यांना ब्रेक नाही. तिथे दुसरे कोणीतरी लागेल. त्यांनाही ब्रेक देण्याचा विचार. - लाईटली काही घेऊ नका.लोकांनी शक्यतो घरात थांबा.देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो. हे आपलं कर्तव्य आहे.- पिंपरी चिंचवड, पुण्यात सर्व व्यवहार बंद आहेत.ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार .- पहिला, दुसरा टप्पा झाला पण आता तिसरा सुरू होतोय. पुढचे टप्पे महत्वाचे आहेत. देशाचे पंतप्रधान यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. आपणही त्याची अंमलबजावणी करायला हवी.- कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीने वागावे. हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे खासगी आस्थापना बंद कराव्यात.- मुख्यमंत्री सातत्याने मुख्यालयात थांबून काम करत आहेत. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलत आहेत.- केंद्राकडून निधी घेतलेला नाही. राज्य सरकारकडे आहे. काळजी करू नका.- कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे.- कोरोनाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.- परदेशातून आलेल्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला.- कोरोनाग्रस्त रुग्णांवर डॉक्टरांचा विमा उतरवणार. त्यांचा जीव महत्वाचा. कुटुंब महत्वाचे आहे. ते रुग्णांवर उपचार करत आहेत त्यामुळे त्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेणार.