बारामती : बारामती शहरात कोरोना ने शिरकाव केला असून एका रुग्णास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे.याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माहिती दिली. हा रुग्ण रिक्षाचालक आहे. सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाल्याने शहरात त्याने प्राथमिक उपचार घेतले.प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला पुण्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णाला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत कोरोनाची त्याला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान,या रुग्णाने बारामती मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आहे. तसेच लोकांना भेटला असल्याने अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बारामतीकरांनी बाहेर फिरू नये घरातच राहावे. सर्वांनी मिळून पुढील काही कालावधीसाठी स्वतःहुन जनता कर्फ्यू लागू करून स्वतःहुन सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान शहरातील श्रीरामनगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसर काॅरनटाईन झोन म्हणून व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत येत आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातून वगळले आहे. कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये. परिसरातील मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत सर्व्हे करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे