Coronavirus Baramati: : बारामतीत 'रेमिडीसिव्हर' च्या तुटवड्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 07:51 PM2021-04-09T19:51:14+5:302021-04-09T19:52:07+5:30
लसीऐवजी रेमिडीसिव्हर उपलब्धतेवर; गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
बारामती : बारामती शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबर रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. इंजेक्शनचा तुटवडा गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती रुग्णाच्या नातेवाईकांना सतावत आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या होत्या.मात्र, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. इंजेक्शन वेळेत उपलब्ध न झाल्यास काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे लसीऐवजी रेमिडवीर च्या तुटवड्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये देखील यापूर्वी रेमिडीसिव्हरचा तुटवडा निर्माण झाला होता.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट लक्ष घातल्याने या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध झाला होता.सध्याच्या परीस्थितीत देखील तुटवडा निर्माण झाल्याने पुन्हा एकदा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडुन होत आहे.
बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन उपलब्ध असणाऱ्या दुकानांचे नाव मोबाईल क्रमांकासह सोशल मीडियावर उपलब्ध झाले आहे.त्यानुसार शहरातील १६ दुकानांमध्ये हे इंजेक्शन विक्रीला ठेवण्यात आले आहे.मात्र,यापैकी एकाही मेडीकलमध्ये हे इंजेक्नशन मागणीच्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.
शहरात रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा कमालीचा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रांगेत उभा रहावे लागत आहे.त्यानंतर देखील इंजेक्शन मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. प्रशासन स्तरावर या इंजेक्शनबाबत कसलाच समन्वय नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे.
....
जखम मांडीला उपचार शेंडीला
बारामती शहरातील एका बड्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, सध्या कोरोनाबाबत ‘जखम मांडीला उपचार शेंडीला’ असा प्रकार सुरु आहे.बारामतीत ७० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात फुफ्पुस निकामी झालेल्या रुग्णाला देखील रेमिडीसिव्हरचा इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नाही. सध्या केवळ गंभीर प्रकृती असणाऱ्या रुग्णांना रेमिडीसिव्हर इंजेक्शन अत्यंत महत्वाचे आहे. वेळेत इंजेक्शन न दिल्यास काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.