Coronavirus Baramati : कोरोनाबाधितांच्या उच्चांकाने बारामती हादरली; एकाच दिवसात आढळले ३९५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:24 PM2021-04-20T21:24:58+5:302021-04-20T21:25:56+5:30
'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध असुन देखील कोरोनाची आकडेवारी वाढतच असल्याने चिंता वाढली आहे.
बारामती: शहरात गेल्या २४ तासात ३९५ एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे बारामतीकर हादरुन गेले आहेत.ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध असुन देखील कोरोनाची आकडेवारी वाढतच असल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या २४ तासात एकूण आरटीपीसीआर नमुने ६८७ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १० आहेत. काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह २४ आहेत. कालचे एकूण एंटीजन २३६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह १०२ आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९५ आहेत. यामध्ये शहर १८९ ग्रामीण २०६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या १४ हजार २८२ वर पोहचली आहे.तर एकूण बरे झालेले रुग्ण १०,८०१ वर गेले आहेत.
दरम्यान,शहरात )५ पेक्षा जास्त कोरोना विषाणू संक्रमीत रूग्ण आढळून आल्यास संबंधित परिसर हा सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करणेत येत आहे. त्यामुळे नागरीकांनी वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरातील ,परिसरातील सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ विलगीकरणात राहावे.
कोव्हिड-१९ बाबत लक्षणे तीव्र झाल्यास अगर आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क करून रूग्णालयात दाखल व्हावे. सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना संबंधित परिसरात येण्यास प्रतिबंध असल्याने त्यांना अत्यावश्यक सेवेच्या कामाव्यतिरिक्त आत येवू देवू नये. यासंबंधित फलक सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ सोसायटीमार्फत लावण्यात यावा. क्षेत्रामध्ये दुचाकी/चारचाकी वाहनांना प्रतिबंध करणेत येत आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या, सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रातील रहिवाशांवर/सोसायटीवर रक्कम रुपये १०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सोसायटीमध्ये नियमित येणा-या कामगारांची चाचणी करावी,अशी सुचना बारामती नगरपरीषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली आहे.
———————————