Coronavirus Baramati : गरजेनुसार रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 02:26 PM2021-04-16T14:26:18+5:302021-04-16T14:59:20+5:30

बारामतीत तपासणी पथक नेमण्याच्या प्रशासनाला सुचना

Coronavirus Baramati: Take action against hospitals which do not use remedicivir and oxygen as required: Deputy Chief Minister Ajit Pawar | Coronavirus Baramati : गरजेनुसार रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा  

Coronavirus Baramati : गरजेनुसार रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा  

Next

बारामती : गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.त्यामुळे गरज नसताना रेमडेसिविर,ऑक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार याांनी सांगितले आहे.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक शुक्रवारी (दि. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. 

पवार पुढे म्हणाले,  या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू.  सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत, नागरिकांकडून त्या निबंर्धांचे पालन केले जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  यांनी बारामती येथील पदाधिकारी , वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रीया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजनपुरवठा करण्यात येईल.आरोग्यविषयक कोणत्याही साधन सामुग्रीची कमतरता असल्यास तत्काळ कळवावे, सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. पोलीस विभागाने विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, इत्यादी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.   

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख,  तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.

Web Title: Coronavirus Baramati: Take action against hospitals which do not use remedicivir and oxygen as required: Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.