पुणे : कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटच्या (covid 19 delta varient) तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (omicron) संसर्गाचा वेग पाच पटींनी अधिक आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे मास्क वापरण्याबाबत नागरिकांनी हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या संसर्गामध्ये सर्जिकल किंवा कापडी मास्कच्या तुलनेत एन ९५ मास्कच (N95 mask) सुरक्षा प्रदान करू शकतो, असा निष्कर्ष पॅडेमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत एन ९५ मास्क वापरण्याचे आवाहन केले होते.
मास्क न घातलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि कोरोनाबाधित रुग्णाने मास्क घातला नसेल तर १५ मिनिटात संसर्ग होतो, कापडाचा मास्क घातला असल्यास २० मिनिटे, सर्जिकल मास्क घातला असेल तर ३० मिनिटे आणि एन ९५ मास्क घातला असेल तर अडीच तासांनी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. संक्रमण होऊ शकते. दररोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा, हे अधोरेखित करण्यात आले आहे.
आपल्याकडे अनेक लोकांना अद्याप मास्क वापरण्याचे तंत्र कळलेले नाही. अनेकदा लोक एकटे असताना नाक आणि तोंड झाकले जाईल अशा योग्य पद्धतीने मास्क वापरतात. मात्र इतर कोणालाही भेटल्यावर तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बोलायला सुरुवात करतात. अशाने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढते. मास्कने कायम आपले नाक आणि तोंड पूर्ण झाकलेले असले पाहिजे. मास्कचा दर्जाही चांगल्या पद्धतीचा असावा. दोन मास्क वापरताना एक नाका-तोंडावर आणि दुसरा हनुवटीवर अशा पद्धतीने घातलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे मत जनरल फिजिशियन डॉ. आशिष देशपांडे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग अधिक आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी काही मिनिटांमध्येच कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. कितीही ठरवले तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपूर्ण संपर्क टाळणे शक्य होत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचा तीन किंवा पाच लेयरचा मास्क वापरणे फायदेशीर ठरते. एकमेकांच्या संपर्कात आलेल्या दोन्ही व्यक्तींनी एन ९५ मास्कचा वापर केल्यास संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते, हे सिद्ध झाले आहे.
- डॉ. कल्पना इंगळे