पुणे : जिल्हाधिकारी यांनी ज्या अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळले आहे. अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतरांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ लागला आहे. अनावश्यक लोकांना पेट्रोल देणार्यांवर सापळा रचून पोलिसांनी ७ पेट्रोल पंपांवर गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांनी संचारबंदीत बाहेर फिरु नये, म्हणून जिल्हाधिकार्यांनी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरांना पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही पेट्रोल पंपचालक अनेकांना गुपचूप पेट्रोल विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील वाहनांची गर्दी कमी होत नव्हती. त्यावर गुन्हे शाखेने शहरात पेट्रोल पंपावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यात काही पेट्रोल पंपचालक अनावश्यक लोकांना पेट्रोलची विक्री करताना दिसून आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत परिमंडळ १ - २, परिमंडळ २ - ३, परिमंडळ १, परिमंडळ ४ - १, परिमंडळ ५ - १ अशा एकूण ७ पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकार्यांनी अनावश्यक लोकांना पेट्रोल विक्री करण्यास बंदी घातली आहे. लोकांना पेट्रोल मिळत असल्याने ते वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहने बंद व्हावीत, म्हणून अशा प्रकारे जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून पेट्रोल विक्री करणार्या पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरु राहणार आहे.