पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर यांसह महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी महत्वाची मंदिरे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महत्वाच्या छोट्या मोठ्या स्वरूपातील यात्रा, उत्सव देखील रद्द केले आहेत. त्याच धर्तीवर पर्यटकांचे आकर्षण असलेला सिंहगड किल्ला देखील आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून असंख्य बळी घेतले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वप्रथम रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने दक्षता व जनजागृतीपर कार्यवाही करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेतेसाठी अनेक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. साहाय्यक वनसंरक्षक संजय कडू म्हणाले, सिंहगडावर अनेक जण पर्यटनासाठी येत असतात. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा आला आहे. तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडावर सुट्टीच्या दिवसांसह इतर वेळी पण गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाढत्या संख्या लक्षात घेता व पर्यटकांच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून वनसंरक्षक विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Coronavirus : पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:58 AM