पुणे: संचारबंदीत पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हाेणारी मारहाण बंद झाली आहे. रविवारी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर लाठ्या चालवल्या होत्या. त्यासंदर्भात तक्रारी झाल्याने आता तशी मारहाण करणे बंद झाल्याचे दिसते आहे.
लॉक डाऊनच्या आजच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांवर खरोखरीच सामसूम होती. पोलिसही फार मोठ्या संख्येने दिसत नव्हते. चौकांमध्ये वाहने लावून एका बाजूला बसून त्यांचे निरीक्षण सुरू होते. एकट्याने जाणाऱ्यांना जाऊ दिले जात होते. तर ग्रुपने जाणाऱ्यांची विचारपूस करून सोडण्यात येत होते. मात्र अशा घटना फारच तुरळक होत्या.ज्यांना हटकले त्यांनी तोंडाला काही लावलेले नसेल तर त्यांना ते लावायला सांगण्यात येत होते.
गल्ली बोळातील किराणा मालाची दुकाने मात्र थोडी खुली होती. परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून त्यांना माल देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. पोलिसही अशा ठिकाणी थांबून गर्दी करून घेऊ नका, अंतर ठेवून रांग लावायला सांगितले जात होते. दुपारी पडलेल्या पावसाने वातावरणात थोडा पावसाळी गारवा आणला. ऊन्हाचा तडाखाही कमी झाला. शहराच्या मध्यभागातील जून्या वाड्यांसमोरच्या रिकाम्या जागांमध्ये जमून तरूण मुलांच्या कोरोना वर तसेच संचारबंदी, २१ दिवस काढायचे तरी कसे, फार होतात ना अशा गप्पा सुरू होत्या.