पुणे : कोरोनामुळे शहरात शुकशुकाट पसरला असताना दुसरीकडे त्याचा वेगवेगळ्या व्यवसायावर परिणाम झालेला दिसत आहे. विशेषत: सध्या विविध सण, उत्सव सुरू आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने कामगारांना रोजगारासाठी धडपडावे लागत आहे. मंडप, लाईट, साऊंड व्यावसायिकांनी सध्या दोन पावले मागे येऊन कोरोनाचा ज्वर ओसरण्यापर्यंत वाट बघण्याचे ठरवले आहे. मार्चच्या अखेरीस लग्नसराईला सुरुवात होणार असून, त्या लग्नसराईवर कोरोनाचे सावट नको, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी केली आहे. या सगळ्यात रोजची कमाई बुडणाऱ्या कामगारांपुढे उभा राहिलेला आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे. कोरोनामुळे मांडव व्यवसायावर झालेल्या परिणामाविषयी माहिती देताना मांडव व्यावसायिक प्रशांत भांड म्हणाले, मागील आठवड्यापासून मंडप व्यवसायावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच लग्नावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती पालकांना आहे. या सगळ्याचा फटका मंडप व्यावसायिकांना बसला आहे. विद्युत रोषणाई, सजावटीचे काम करणारे मंडप व्यवसायाशी संबंधित आहे. मंडप व्यवसायावर झालेल्या परिणामुळे कापड खरेदी करण्याचा वेग मंदावला आहे. आमच्याकडे कामाला असणाºया कामगाराला साधारण ७00 ते ८00 रुपयांचा रोज दिला जातो. काम वाढल्यास बाहेरुन मागवलेल्या कामगारांना १000 रुपयांचा रोज द्यावा लागतो. आता व्यवसायावर कोरोनाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने कामगारांचा रोज बुडत आहे. त्यांना आर्थिक चणचण जाणवत आहे. पुढील दिवसांत गुढीपाडवा, याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अशा वेळी कोरोनाचे सावट कायम राहिल्यास मंडप व्यावसायिकांबरोबरच कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागेल.
* कोरोनाचा साऊंड व्यवसाय आणि व्यावसायिकांवर तितकासा परिणाम झालेला नाही. ज्याकरिता नियमित साऊंडची गरज आहे अशा ठिकाणी साऊंड सर्व्हिस सुरु आहे. उदा. हॉटेल, पब, क्लब, लग्नाचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे आताच त्याविषयी काय सांगता येणार नाही. याशिवाय वाढदिवस, हॉटेलमधील पार्टीज याच्या आॅर्डर नियमित सुरु आहेत. त्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. होळी, धूलिवंदन, रंगपंचमीचे वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये इव्हेंट सुरु आहेत. त्याच्या आॅर्डर साऊंड व्यावसायिकांना मिळत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थितीने वेगळे वळण घेतल्यास त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता मोठमोठे उत्सव, कार्यक्रम जाहीररीत्या करण्यास शासनाकडून मनाई आहे. ही अडचण कोरोनामुळे झाली आहे. - आदित्य कराळे (साऊंड व्यावसायिक)
* सध्या वातावरणातील बदल याचा ग्राहकांवर परिणाम झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडक ऊन जाणवत आहे. तसेच मध्येच आभाळ भरुन येणे, ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवार रस्त्यावर गर्दी तुरळक असली तरी देखील कोरोनाच्या मागील तीन ते चार दिवसांपासून झालेल्या संसर्गाने ग्राहकांमध्ये भीती आहे. वडापाव, रसविक्रेते, नीरा विक्रेते, पाणीपुरी, भेळविक्रेते यांच्याकडे नेहमी दिसणारी गर्दी तुलनेने कमी झालेली आहे. वातावरणातील बदल हे त्यामागील एक कारण असले तरी कोरोनामुळे छोट्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. - एक नीराविक्रेती महिला