पुणे : पुण्यात काेराेनामुळे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता पुण्यात काेराेनाच्या मृतांची संख्या चार झाली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, तिचा काही दिवसांपूर्वी काेराेनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला हाेता. परंतु पाेस्टमार्टममध्ये तिला पुन्हा काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे. त्याचबराेबर एका 48 वर्षीय रुग्णाचा देखील ससूनमध्ये मृत्यू झाला असून त्याचा तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला. त्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले हाेते
कोरोना व्हायसरमुळे पुण्यात आतापर्यंत चाैघांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी एका 60 वर्षीय महिलेला मृत अवस्थेत ससून रुग्णालयात आणले होते. या महिलेच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काही दिवसांपूर्वी याच महिलेला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयातून नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता.त्यामुळे तिला घरी पाठवण्यात आले होते. परंतु आजारी असल्यामुळे या महिलेचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरीच मृत्यू झाला. त्यानंतर ससून रुग्णालयात मृतदेह आणला. मृतदेहाची तपासणी केली असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मागील काही दिवसात या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे.