महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागाच व्हेंटिलेटरवर, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागात अद्यापही सुसूत्रता नाही
विमाननगर - विश्रांतवाडी आळंदी रस्त्यावर रविवारी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचे निधन झाले होते. कोरोना संशयीत म्हणून "या"मृतदेहाची कार्यवाही करण्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते. महापालिका आपत्ती व्यवस्थापन व इतर विभागांचा समन्वय नसल्यामुळे "हा"मृतदेह सुमारे तीन तास रस्त्यावरच पडून होता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या कामात अद्यापही सुसूत्रता नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटनांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाही करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी आळंदी रस्त्यावरील एका अनोळखी व्यक्तीचे रस्त्यावरच निधन झाले होते. हा अनोळखी व्यक्ती आठ-दहा दिवसांपासून रस्त्यावरच भीक मागत होता. दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे तो व्यक्ती रस्त्यावरच पडून होता. रविवारी दुपारी रस्त्यावरच त्याचे निधन झाले. तीन वाजण्याच्या सुमारास स्थानिक कार्यकर्त्यांनी याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा व शवविच्छेदन करण्याबाबतच्या सूचना दिल्या.सध्य परिस्थितीत या अनोळखी मृतदेहा बाबत पुढील सोपस्कार करणे अवघड होते. स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या जाधव व सामाजिक कार्यकर्ते अशितोष जाधव यांनी याबाबतीत पुणे महापालिका आरोग्य विभागाला कळविले. मृतदेह उचलण्यापासून शवविच्छेदनासह अंत्यविधी पर्यंतची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे याबाबत आरोग्य विभागात कळविण्यात आले. मृतदेह उचलण्यासाठी विश्रांतवाडी स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांना "किट "ची आवश्यकता होती. सध्या किट उपलब्ध नसल्यामुळे ते आणण्यासाठी कैलास स्मशानभूमी या ठिकाणी जावे लागले. तेथून किट आणण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तास लागले. त्यानंतर मृतदेहाच्या परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सात वाजण्याच्या सुमारास तब्बल चार तासानंतर सदरचा मृतदेह हा ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विश्रांतवाडी स्मशानभूमीतील अरुण जंगम यांच्यासह नितीन पठारे, सलीम शेख, प्रशांत मुगळीकर, लहू शिंदे यांनी आवश्यक किट उपलब्ध झाल्यानंतर सदरचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला. पीएमपीएल पुष्पक शववाहिनी चे चालक बळवंत घोडके हे एकटेच मृतदेह घेऊन ससून रुग्णालयात गेले. त्यांच्याजवळ देखील आवश्यक किट उपलब्ध नव्हते. मात्र पी एम पी एल कडून देण्यात आलेल्या किटसदृश्य वस्तूं सह मास्क चा वापर करून त्यांनी हे काम मार्गी लावले. खाजगी रुग्णालयात अंत्यविधीसाठी रुग्णवाहिका नेली असता त्या संबंधित रुग्णालयांकडून किट उपलब्ध होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र आपल्याकडे इतर मृतदेहांच्या बाबतीत आम्हाला देखील सुरक्षेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची विनंती त्यांनी यावेळी केली. महापालिका आरोग्य विभागाकडून अद्यापही आवश्यक किट व सोयी सुविधा पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रत्यक्षात गंभीर समस्या निर्माण होत असून ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा देखील महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना आजाराचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिक तसेच अधिकारी व कर्मचारी देखील भयभीत झालेले आहेत. पुणे महापालिका आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अद्यापही याबाबत समन्वय दिसून येत नाही. शनिवारी महर्षी नगर येथे एका युवकाचा पदपथावर मृत्यू झाला. परंतु पुढील कार्यवाही करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची या वादातून रात्री बारा वाजेपर्यंत मृतदेह रस्त्यावरच पडून होता. दरम्यान वारंवार घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत महापालिका आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्य विभागाने कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक सुरक्षित किट, मनुष्यबळ, साहित्य, रुग्णवाहिका,औषध फवारणी सह अंत्यविधी पर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून अद्याप त्याबाबतीत कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यावर घडणाऱ्या अशा घटनांच्या बाबतीत प्रत्यक्ष कार्यवाही करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेस. या गंभीर समस्येबाबत नगरसेविका ऐश्वर्या जाधव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.महापालिका प्रशासनाने या संदर्भात त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. सदर बाबतीत आपण महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले. याबाबत महापालिका आपत्ती विभागाचे प्रमुख गणेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागात व्हेंटिलेटरवर आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.