पुणे : शहराचा पुर्व भाग कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सील करण्यात आला आहे. संचारबंदी केली असताना देखील अनेकदा त्या सुचनेकडे दुर्लक्ष करून नागरिक बाहेर फिरायला बाहेर पडत आहेत. तर जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी करण्यासाठी काही दुकानासमोर ग्राहक गर्दी करत आहेत. दुकानदाराने सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन करून देखील अनेकजण मनमानी करून रांगेत उभे राहत आहेत. त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचा फटका इतरांना सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही ग्राहक ऐकत नसतील तर त्यात आमची काय चूक ? असा प्रश्न स्थानिक दुकादारांनी केला आहे. शहरात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भवानी पेठेत आढळून आले आहेत. यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही. तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. या भागात मोठया संख्येने किराणा भुसार मालाची दुकाने आहेत. शहरातील अनेक दुकानदार माल खरेदीसाठी या भागात येतात. आता ती संख्या थोड्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र किराणा माल खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सूचना देऊनही ते बेशिस्तपणे वागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात आले नाही.
दिवसातून तीन, चार वेळा पोलिसांची फेरी होत असते. तरीही नागरिक रात्रीच्या वेळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची धांदल उडत आहे. सायंकाळनंतर पोलिसांची नजर चुकवून नागरिक घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मंडई, दगडूशेठ परिसरातही सकाळच्या वेळेत नागरिक गाडीवर फिरताना दिसून आले आहेत. हा परिसर कर्फ्युमध्ये येत नसला तरी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस या भागातील नागरिकांना सातत्याने घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. तसेच गल्ल्यांमध्ये बांबू आणि लोखंडी रॉड टाकून प्रवेश बंद करण्यात आले आहेत.
दुकान उघडण्याआधीच ग्राहक दुकानासमाेर येऊन बसतातसकाळी दुकान उघडण्याच्या अगोदर अनेक ग्राहक दुकानासमोर येऊन बसतात. दुकानासमोर बऱ्याचदा ग्राहकांची रांग लागलेली असते. त्यांना तुम्ही तुमच्या किराणा मालाची यादी व्हाट्स अप करा किंवा लिहून ठेवा असे सांगितले तरी देखील ते ऐकत नाहीत. रांगेत उभे राहूनच वस्तू खरेदी करायच्या असतात. विनंती करून देखील ते ऐकायला तयार नसतात. उन्हात उभे राहुन वाट पाहत बसतात. अशावेळी पोलीस आले तर ते दुकानदाराला दोष देतात. त्याला विचारणा करतात. आमचे कुठे चुकते ? असा प्रश्न सील करण्यात आलेल्या भागातील एका दुकादाराने उपस्थित केला आहे.