सुकृत करंदीकरपुणे : कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूवरील लशीचे उत्पादन येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत भारतात उपलब्ध करून देण्याचे नियोजन केल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली. इंग्लंडमधल्या आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील चाचण्या यशस्वी होतील, ही शक्यता गृहीत धरून तातडीने लस उत्पादन सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक जोखीम उचलण्यास सिरम तयार झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.इंग्लंडमधील आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच या लशीची मानवी चाचणी इंग्लंडमध्ये घेतली. सिरम इन्स्टिट्यूटकडे असणारी उच्च दर्जाची उत्पादनक्षमता लक्षात घेऊन ‘आॅक्सफर्ड’ने या लशीच्या उत्पादनाचे हक्क ‘सिरम’ला दिले आहेत. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पूनावाला बोलत होते. आॅक्सफर्डमधील चाचण्या यशस्वी होताच पुढील दोन आठवड्यांत पुणे आणि मुंबईतही मानवी चाचण्या (ह्युमन ट्रायल) सुरू होतील, असेते म्हणाले.देशभर लॉकडाऊन जाहीर करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय धाडसी आणि अचूक होता. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या कदाचित मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल; मात्र त्यामुळे घाबरून जाता कामा नये. संख्या वाढली म्हणून पुन्हा लॉकडाऊन वाढविणे योग्य ठरणार नाही, असेही मत पूनावाला यांनी या वेळी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आता सार्वजनिक जीवनात सर्वांना अधिक काळजी घ्यावी लागेल. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळावे लागेल; पण थबकलेल्या अर्थकारणाला गती देण्यासाठी सगळे व्यवहार हळूहळू पूर्ववत चालू करावेच लागतील.’’कोरोना विषाणूवरील लशीबाबत पूनावाला म्हणाले, ‘‘कोविड-१९ वरील ५० लाख लशींचे उत्पादन दोन आठवड्यांच्या आत करण्याची ‘सिरम’ची क्षमता आहे. पुढच्या सहा महिन्यांत ही क्षमता दुपटीने वाढवता येईल. अर्थात, सध्या या लशीच्या विविध चाचण्या इंग्लंडमध्ये चालू आहेत. ‘आॅक्सफर्ड’च्या संशोधकांवर आमचा विश्वास आहे. लस यशस्वी ठरल्यानंतरदेखील त्याचे उत्पादन घेण्यास पुढील सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागतो. हा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आम्ही आतापासूनच निर्मिती व्यवस्था उभी करत आहोत. ‘कोविड-१९’वरील लस उत्पादनासाठी नवी उत्पादनक्षमता निर्माण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मात्र ‘आॅक्सफर्ड’च्या चाचण्या यशस्वी होता क्षणीच ही लस देशाला उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही संभाव्य आर्थिक नुकसानाची मोठी जोखीम पत्करली आहे.’’‘आॅक्सफर्ड’ने केवळ उत्पादनाचे हक्क ‘सिरम’ला दिले आहेत. मात्र, आम्हीदेखील कोडोजेनिक्स या अमेरिकी कंपनीसोबत विषाणूवरील प्रभावी लशीचे स्वतंत्र संशोधन सुरू केले आहे. यातून २०२१ पर्यंत या विषाणूवरील प्रभावी लस बाजारात आणण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास पूनावाला यांनी व्यक्त केला. आमच्या या संशोधनाचे पेटंट आम्ही घेणार नाही. जगातल्या जास्तीत जास्त लोकांना ही लस मिळावी, यासाठी हे संशोधन खुले ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, पारंपरिक बीसीजी लशीमध्ये काही सुधारणा करण्याचेही प्रयत्न ‘सिरम’ने चालवले आहेत. जगभरातल्या सहा औषध कंपन्या यावर काम करत आहेत. सध्या प्राण्यांवर या लशीच्या चाचण्या चालू असून विषाणूंविरोधात प्रभावी असणारी ही लस येत्या वर्षभरात उपलब्ध होईल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले.>प्रतिकारशक्ती वाढवा, निरोगी राहा...दीड अब्जापेक्षा जास्त लसनिर्मिती करणाऱ्या जगातल्या सर्वांतमोठ्या लस उत्पादक कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’च्या वाचकांना संदेश दिला, ‘‘नियमित व्यायाम करा. स्वत:ला तंदुरुस्त ठेवा. प्रतिकारशक्ती वाढवा. म्हणजे कोणत्याच विषाणूंना तुम्ही बळी पडणार नाही. ज्यांची प्रतिकार क्षमता कमी असते त्यांनाच विषाणू लवकर गाठतात, हे लक्षात घ्या. घरातल्या आजारी आणि ज्येष्ठांची अधिक काळजी घ्या.’’>‘थँक्स टू पीएम मोदी’कोणतीही नवी लस बाजारात आणायची म्हटले, की त्यात किमान ६-७ वर्षांचा कालावधी जातो. विविध परवानग्या, नियमावली यामुळे लस संशोधनाची प्रक्रिया भारतात वेळखाऊ आहे. कोणतीही नवी लस बाजारात आणायची तर त्यात किमान ६-७ वर्षे जातात; परंतु मला सांगताना खूप आनंद होतो, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लाल फिती’चा हा गुंता सोडवल्याने अवघ्या वर्षभरात लस बाजारात आणणे शक्य होणार आहे. संशोधनाला मान्यता मिळण्याची प्रक्रिया मोदींमुळे खूप जलद झाली आहे.-अदर पूनावाला, सीईओ, सिरम इन्स्टिट्यूट>भारतापुढील संधी वाढतील‘‘कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर युरोप, आशियातल्या अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादन प्रकल्पांसाठी भारताला प्राधान्य देतील. कच्च्या मालासाठी चीनकडे जाणाºया अनेक भारतीय कंपन्यादेखील देशांतर्गत उत्पादनावर भर देऊ लागतील. उत्पादनासाठीचे चीनवरील जगाचे अवलंबित्व कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या स्थितीचा फायदा नक्कीच घेतील. कोरोनापश्चात औद्योगिक जगतात भारतासाठीच्या संधी निश्चितच वाढलेल्या असतील. या अनुकूल स्थितीचा लाभ घेण्यासाठी भारतीय मानसिकता बदलावी लागेल,’’ असे मत पूनावाला यांनी आवर्जून व्यक्त केले.>स्थलांतरितांचा प्रश्नलॉकडाऊनमुळे स्थलांतरितांचा प्रश्न बिकट झाला आहे. या बाबतीत थोडे अधिक चांगले नियोजन होण्याची गरज होती.आताचा अनुभव कदाचित पुढच्या संकटकालीन स्थितीत कामाला येईल; परंतु आता या स्थलांतरितांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यांचे शारीरिक, लैंगिक शोषण होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.त्यांना पौष्टिक अन्न आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे या घडीला महत्त्वाचे आहे, असे मत अदर पूनावाला यांनी व्यक्त केले.
‘आॅक्सफर्ड’मध्ये काय चालू आहे?आॅक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपचे संचालकअँड्र्यू पोलार्ड यांच्या नेतृत्वाखालील चमू कोरोनावरील लस संशोधन करीत आहे.या लशीची मानवी चाचणी इंग्लंडमध्येचालू झाली आहे. या लस संशोधनाला८० टक्के यश मिळण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.>‘कोरोना’ने दिलेले धडेकोरोनाच्या जागतिक उद्रेकातून भारताने काय शिकावे, या प्रश्नावर पूनावाला म्हणतात :बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण हवे. भूसंपादन प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद झाली पाहिजे. जमीनविषयक प्रकरणांची तड वेगाने लावण्यासाठी स्वतंत्र न्यायालयअसले पाहिजे.दहावी-बारावी-पदवी या पारंपरिक शिक्षणाला फार अर्थ नाही. त्याऐवजी औद्योगिक आणि सेवा क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्यविकास शिक्षणावर भर द्यायला हवा.लोकांच्या मानसिकतेतही बदल हवा. उद्योगस्नेही वातावरण, उद्योगस्नेही कायदे असल्याखेरीज आर्थिक प्रगती होणार नाही.